माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे टीकास्त्र

ज्यांची पोटं भरली, अजीर्ण झाले, ते पक्ष सोडून चालले आहेत. अशा प्रकारे पक्ष सोडणाऱ्या लबाडांना स्थान देऊ नका, अशा शब्दात माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ‘आयाराम-गयाराम’ करणाऱ्यांची हजेरी घेतली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, अपक्ष असा प्रवास करून सध्या भाजपच्या शहराध्यक्षपदी बसलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कोलांटउडय़ा स्वार्थासाठी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

दापोडी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, आपासातील वाद आता मिटवा. पक्ष टिकला तर आपण टिकणार आहोत, याचे भान ठेवा. सामान्यांचे प्रश्न हाती घ्या. गुन्हेगार तसेच भ्रष्ट व्यक्तींना पक्षात प्रवेश देऊ नका. पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी काँग्रेसचे खरे योगदान आहे. राष्ट्रवादीचे नेते उद्घाटनांचा सपाटा लावत आहेत. मात्र, ही कामे काँग्रेस सरकारच्या ‘जेएनयू’ मिळालेल्या पैशातून होत आहेत. त्याचे खरे श्रेय काँग्रेसचे आहे. पैसा काँग्रेसमुळे मिळाला, तुम्ही उद्घाटने कसली करता आहात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्यांना काँग्रेसशी रूचत नव्हते, ते आता काँग्रेसशी आघाडी करण्याची भाषा करत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भाजपने दोन वर्षांत केवळ घोषणा दिल्या, पिंपरीत एक रूपयाचे काम सरकारने केले नाही. मुख्यमंत्री ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही कार्यपद्धती अवलंबतात, असे ते म्हणाले.

सत्ता तुमचीच, मग चौकशी का करत नाही?

पिंपरी-चिंचवडमध्ये कायदा सुव्यवस्थेची वाट लागली आहे, अशी टीका शहराध्यक्ष सचिन साठे यांनी या वेळी केली. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होत नाही, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अद्याप सुटू शकलेला नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला, ते भाजपमध्ये येत आहेत. पालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी हीच मंडळी करत आहेत. तुमचीच सत्ता आहे, चौकशी करण्यापासून कोणी रोखले आहे, असा मुद्दाही साठे यांनी उपस्थित केला.