काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका लहान मुलीने हृदयशस्त्रक्रियेसाठी थेट पंतप्रधानांनाच पत्र लिहिले होते व त्यानंतर पुण्यातील एका खासगी रुग्णालयाने तिची शस्त्रक्रिया मोफत करून दिली होती. आता आईवडिलांचे छत्र नसलेल्या आणि त्यामुळे कोणतीही कागदपत्रेही जवळ नसलेल्या सोलापुरातील एका मुलीची शस्त्रक्रिया पुण्यात मोफत झाली आहे. ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा’च्या (आरबीएसके) डॉक्टरांनी या मुलीची अडलेली शस्त्रक्रिया जमवून आणली.

रमा जाधव (नाव बदलले आहे) या १२ वर्षांच्या मुलीची ही गोष्ट आहे. तिची आई व वडीलही घर सोडून गेल्यामुळे ती आजी व मामांबरोबर राहते. आई-वडिलांबरोबर राहत नसल्यामुळे तिच्याकडे शिधापत्रिका आणि उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे नाहीत. त्यामुळे तिच्या शस्त्रक्रियेसाठी मदत मिळण्यास अडचण येत होती. पिंपरीतील एका डॉक्टरांच्या ओळखीतून पुण्यातील आरबीएसके डॉक्टर प्रणाली वेताळ यांना रमाबद्दल समजले. त्यांच्या समन्वयातून स्वारगेटजवळील एका खासगी रुग्णालयात तिची ‘टू-डी एको’ ही हृदयाची चाचणी मोफत झाली. तिथे तिला आणखी एक चाचणी करायला सांगण्यात आले, पण त्यासाठी जवळपास १२ हजार रुपये खर्च येणार होता. पैसे भरावे लागणार हे कळल्यावर तिचे पालक चिंतित झाले. त्यांना समजावून सांगितल्यावर दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात ही चाचणी झाली आणि तिला शस्त्रक्रिया करावी लागणार हे स्पष्ट झाले. डॉ. वेताळ म्हणाल्या, ‘‘चाचणीसाठी आधीच पैसे भरावे लागल्याने तिच्या पालकांकडील पैसे संपले असावेत, त्यामुळे शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेतला नाही.  बुधराणी रुग्णालयातील समन्वयकांशी बोलल्यावर रमाची शस्त्रक्रिया तिथे मोफत होऊ शकेल अशी आशा निर्माण झाली. तिचे मामा व आजी तिला तिथे घेऊन आले आणि १ जुलैला ‘इन्ट्राकार्डिअ‍ॅक रीपेअर फॉर एएसडी – पल्मोनरी स्टेनॉसिस’ ही शस्त्रक्रिया तिच्यावर करण्यात आली. ’’ मामाची शिधापत्रिका तसेच उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल पुन्हा काही प्रश्न निर्माण झाले होते, परंतु त्यामुळे काही अडचण येणार नाही, तसेच रमाला एक ते दोन दिवसांत घरी सोडले जाईल.

या प्रकारच्या गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी योजनेतून होत नसल्याचे दिसून येत आहे. अशा काही मुलांच्या मोफत शस्त्रक्रिया आम्ही केल्या. ‘आरबीएसके’ डॉक्टरांनाही त्याबाबत कळवले असून अधिकाधिक बालकांना मदत करण्याचा प्रयत्न असेल.

– डॉ. शिव गुप्ता, प्रमुख, कार्डिअ‍ॅक सर्जरी विभाग, फाबियानी अँड बुधराणी हार्ट इन्स्टिटय़ूट