पुणे : राज्यातील पालघर, नाशिक आणि पुण्यात बुधवारी (१५ सप्टेंबर) जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त के ला आहे. पुढील तीन दिवस कोकणात बहुतांशी ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ओडिशाच्या किनारपट्टीवरील उत्तर भागाकडे तयार झालेले अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र ओडिशाच्या अंतर्गत असलेल्या उत्तरेकडे सरकले आहे. सध्या हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण-पूर्व ओडिशाच्या किनोजहारागडपासून ५० किलोमीटर, तर चंदबेलीपासून १०० कि.मी. अंतरावर आहे. पुढील २४ तासांत हे क्षेत्र उत्तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश पार करणार आहे. त्यानंतरच्या १२ तासांत या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होणार आहे. तसेच दक्षिण गुजरात आणि आसपासच्या भागावर देखील गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र कायम असून त्याची तीव्रता देखील आणखी एक दिवस राहणार आहे. त्यामुळे मुंबई व कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर राहणार आहे.

मंगळवारी दिवसभरात  पुण्यात ०.९ मिलिमीटर, सांगली आणि कोल्हापुरात प्रत्येकी ०.२ मि.मी., साताऱ्यात दोन मि.मी., महाबळेश्वर येथे ३७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.  डहाणूत सहा मि.मी., रत्नागिरीत एक, तर सांताक्रु झ येथे दोन मि.मी. पाऊस पडला.  सर्वाधिक तापमान सोलापुरात ३३.४ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी महाबळेश्वर येथे १७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.