आपल्या अलौकिक प्रतिभेने कला सादरीकरण करणारे पं. कुमार गंधर्व यांचे संगीत नव्या शोधांची प्रेरणा देणारे आहे, असे मत प्रसिद्ध हिंदूी कवी उदयन वाजपेयी यांनी रविवारी व्यक्त केले. त्यांचे शिष्य झाले, पण अनुयायी कोणी होऊ शकणार नाही. त्यांचे घर मोठे होऊ शकते, पण घराणे होऊ शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी कुमार गंधर्व यांच्या गायकीचे वैशिष्टय़ उलगडले.
कुमार गंधर्व प्रतिष्ठान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र आणि आशय फिल्म क्लब यांच्यातर्फे कुमार गंधर्व यांच्या ९०व्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतगुरू पं. शंकर अभ्यंकर, उदयन वाजपेयी आणि अमरेंद्र धनेश्वर यांनी कुमारजींचे वेगवेगळे पैलू उलगडले. तर कुमारजींचे शिष्य आणि प्रसिद्ध गायक पं. सत्यशील देशपांडे यांनी ‘संगीत परंपरा आणि कुमारजी’ या विषयावर दृक्श्राव्य विवेचन केले.
उदयन वाजपेयी म्हणाले, शास्त्रीय संगीत सादर करताना कलाकार संस्कृतीचे पदर उलगडत असतो. सामगान ही संगीताची उत्पत्ती असून, पठण पद्धतीने बंदिशीचे बोल पदगायनाच्या दृष्टीने तोडले जातात. या ‘बोल बाट’च्या माध्यमातून कुमारजींनी सांगीतिक अवकाश शोधला. निर्गुणी भजनाची पुनव्र्याख्या ही त्यांची आधुनिक दृष्टी आहे. कुमारजींच्या गायनातून काव्यकला आणि भक्तिकला या मिलाफाद्वारे तुलसीदास, कबीर आणि सूरदास हे नव्याने उलगडतात.
पं. शंकर अभ्यंकर म्हणाले, कुमारजींची आलापी ऐकताना हे स्वर आणि त्यांचे नक्षीकाम वेगळे आहे याची जाणीव झाली. २४ तास संगीतातच रमलेले व्यक्तिमत्त्व असेच कुमारजींबाबत म्हणता येते.
अमरेंद्र धनेश्वर म्हणाले, पारंपरिक बंदिशीमध्ये भक्तिसंगीत ही कला असून, तिचा स्वतंत्रपणे विचार कुमारजींनी केला होता. नायिकाप्रधान बंदिशी असलेल्या संगीतामध्ये नायकाचा विचार कुमारजींनी केला. लोकसंगीतातील शब्द त्यांनी शास्त्रीय संगीतामध्ये चपखलपणे आणले. त्यांच्या सृजनाला अनेक आयाम होते.
पं. सत्यशील देशपांडे म्हणाले, बुजुर्ग कलाकारांवर केलेले प्रेम कुमारजींनी आमच्यापर्यंत संक्रमित केले. रागाच्या मुळाशी जाण्याचे काम त्यांनी केले.