राज्य मंडळाकडून फेब्रुवारी, मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मंडळाने मुदतवाढ दिली असून विद्यार्थी २१ ऑक्टोबपर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतील. निवडणुकीची कामे असल्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत होती.
बारावीचे अर्ज भरण्यासाठी सोमवापर्यंत राज्य मंडळाकडून मुदत देण्यात आली होती. मात्र, शिक्षकांना निवडणुकीची कामे असल्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत होती. त्या मागणीचा विचार करून मंडळाने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थी नियमित शुल्कासह २१ ऑक्टोबपर्यंत अर्ज भरू शकतील, तर विलंब शुल्कासह ३१ ऑक्टोबपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना बँकेत चलन सादर करण्यासाठी नियमित शुल्कासह २२ ते ३० ऑक्टोबर आणि विलंब शुल्कासह १ ते ५ नोव्हेंबर मुदत देण्यात आली आहे.
बारावीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया झाल्यानंतर दहावीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी शाळांनी दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांची ऑफलाइन माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून ठेवावी, अशा सूचना मंडळाने शाळांना दिल्या आहेत.
परीक्षेचे अर्ज आणि अधिक माहिती http://www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.