सर्पदंश झाल्यावर चावलेला साप विषारी होता की बिनविषारी हा सर्वात उपस्थित होणारा प्रश्न. विषारी-विनविषारी ओळखणारी रक्तचाचणी सध्याही उपलब्ध आहे. परंतु डॉक्टर जवळ नसतानाही अवघ्या तीन मिनिटांत हे ओळखू शकणाऱ्या चाचणीचे किट तळेगावमधील एका ‘स्टार्ट अप’ कंपनीने बनवले आहे. साप चावलेल्या ठिकाणच्या रक्ताचे २-३ थेंब या किटवर टाकून साप विषारी की बिनविषारी हे ओळखता येऊ शकेल.

‘डायग्नम’ नावाचे हे किट ‘ऑग्झोलोटल बायोटेक्नोलॉजीज प्रा. लि.’ या कंपनीने विकसित केले असून ते अद्याप बाजारात उपलब्ध नाही. परंतु त्याच्या प्रयोगशाळेतील चाचण्या झाल्या असून आता प्रत्यक्ष चाचण्या केल्या जाणार असल्याची माहिती कंपनीच्या मेधा सोनवणे-निकम यांनी दिली. यात साप चावलेल्या ठिकाणच्या रक्ताचे थेंब किटवर टाकल्यावर साप विषारी असल्यास लाल रंगाच्या दोन रेषा दिसू लागतात आणि बिनविषारी असल्यास एकच रेष दिसते. ‘इंडियन सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी आंत्रप्रेन्यूअर्स पार्क’ व ‘बिझनेस इक्युबेटर्स असोसिएशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्टार्ट अप कंपन्यांसाठीच्या ‘इस्बा’ या नुकत्याच झालेल्या परिषदेत हे उत्पादन सादर करण्यात आले.

वैद्यकीय जैवतंत्रज्ञानाचे शिक्षण घेतलेल्या मेधा म्हणाल्या, ‘‘मी शाळेत असल्यापासून मावळमध्ये सर्पमित्र म्हणून काम करत होते. सध्या साप चावल्यावर ‘बीटीसीटी’ ही ‘ब्लड क्लॉटिंग टाइम’ ही रक्तचाचणी केली जाते, परंतु त्याचा निष्कर्ष कळायला २० ते ३० मिनिटे लागतात. विषारी व बिनविषारी ओळखण्यासह शरीरात किती विष गेले हेही सांगणारी ‘एलायझा’ चाचणी विशेष वापरात नाही, तसेच त्याला दीड तास लागू शकतो. हे नवीन प्राथमिक चाचणीचे किट अगदी कमी वेळात चाचणी करू शकत असून ते ग्रामीण भागात सहज वापरण्याजोगे व कमी खर्चिक असेल. अमित राजस यांनी या किटसाठी मदत केली.’’