करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी, अधिकारी दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळं एकीकडे त्यांच सर्वत्र कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र काही कर्मचाऱ्यांमुळे पोलीस दलाला मान खाली घालावी लागते आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात एका पोलीस उपनिरीक्षकाने ५५ वर्षीय ‘पोलीस मित्र’ व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित घटनेची सत्यता पडताळून चौकशी करू, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी सांगितले आहे.

अरुण गोसावी असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव असून एका पोलीस उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप गोसावी यांनी केला आहे. दरम्यान, गोसावी हे गेल्या दहा वर्षापासून पोलीस मित्र म्हणून काम करीत आहेत. याप्रकरणी गोसावी म्हणाले, “रविवारी माझ्या मुलीने पिझ्झा मागवला होता. तेव्हा, घरकुल परिसरात पोलीस बंदोबस्त असल्याने डिलिव्हरी बॉयला आत येण्यास परवानगी नव्हती. मी स्वतः गेटवर आलो त्यावेळी पोलीस मित्र असलेल्या दोन तरुणांशी किरकोळ वाद झाला. त्यानंतर पिझ्झा घेऊन घरी गेलो. परंतु, रात्री नऊच्या सुमारास एक पोलीस उपनिरीक्षक त्यांच्या एका कर्मचाऱ्यासोबत आले. त्यांनी मला गेटवर जायचं आहे असं सांगून गेटवर आणताच काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्याचवेळी इतर दुसऱ्या कर्मचाऱ्याने पण मला मारहाण केली.” या बेदम मारहाणीमुळे गोसावी यांच्या अंगावर व्रण उमटले आहेत.

पोलीसांसाठी अरुण गोसावी हेच करीत होते जेवणाची व्यवस्था

घरकुल परिसरात पोलीस बंदोबस्त असलेल्या पोलिसांच्या जेवणाची आणि आरामाची व्यवस्था अरुण गोसावी हेच करीत होते. जेव्हा, पोलीस उपनिरीक्षक त्यांना भेटायला आले तेव्हा गोसावी जेवण करीत होते. त्यांना वाटलं पोलिसांना अधिकचं जेवण हवंय. परंतु, गेटवर येताच दुसरं प्रकरण समोर आलं आणि त्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, असं गोसावी यांनी सांगितलं.