करोनाचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात झपाट्याने वाढत आहे. करोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणात आता पुण्याने मुंबईला देखील मागे टाकले आहे. पुण्यात आज ४६ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ८३५ नवे करोनाबाधित आढळले. करोनाबाधितांची एकूण संख्या आता ७४ हजार ९३३ वर पोहचली आहे.

आजपर्यंत १ हजार ७८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ४९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना आज घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर ५८ हजार ७०६ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ७०४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून २३ जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३६ हजार ७८ वर पोहचली आहे. आज ७९ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २५ हजार ६० जण करोनमुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात सध्या ३ हजार ३७२ अॅक्टिव्ह रुग्ण संख्या आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतीक राजधानी असलेलं पुणे शहर रविवारी भारतातील करोनाच्या संसर्गाची राजधानी बनलं. देशात सर्वाधिक रुग्णांची पुणे शहरात नोंद होत असल्याने हे शहर मुंबईला मागे टाकत देशातील नवं ‘करोना हॉटस्पॉट’ बनलं आहे.

महाराष्ट्रात करोनाचे ८ हजार ४९३ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर २२८ रुग्णांचा मागील २४ तासांमध्ये करोनामुळे मृत्यू झाला आहे. ११ हजार ३९१ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या आता ६ लाख ४ हजार ३५८ इतकी झाली आहे. यापैकी ४ लाख २८ हजार ५१४ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २० हजार २६५ रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात १ लाख ५५ हजार २६८ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.