पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या प्रवासावर कित्येक तास खोळंबून राहावे लागत असल्याने प्रवाशांना अनेक गैरसोईंना सामोरे जावे लागत आहे. दररोज टोलच्या माध्यमातून लाखो रुपये गोळा होत असले तरी वाहतुकीत अडकलेल्या प्रवाशांसाठी या मार्गावर कोठेही सामान्य सुविधा किंवा सुरक्षाविषयक गोष्टी नसल्याचे अधोरेखित झाले आहे.
द्रुतगती महामार्गावर खंडाळा बोगदा व आडोशी बोगदा या दोन ठिकाणी अनुक्रमे २२ जून व १९ जुल रोजी मोठय़ा प्रमाणात दरडी कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन मुंबई व पुणे या शहरांचा संपर्क तुटला होता. आडोशी बोगद्याजवळ कोसळलेल्या दरडीमध्ये २ जण ठार व ३ जण जखमी झाले होते. यानंतर द्रुतगती महामार्गावर पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी या मार्गावरील धोकादायक ठिकाणांची पाहणी करण्यात आली. या वेळी खंडाळा ते खोपोली दरम्यान आठ ठिकाणे धोकादायक आढळल्याने २२ जुलपासून द्रुतगती मार्ग सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत बंद ठेवून वाहतूक राष्ट्रीय महामार्गावरुन वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात तेथील दरडी उतरवण्याचे काम सुरू आहे.
यामुळे द्रुतगती व राष्ट्रीय महामार्गावर रोजच मोठी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनचालक व प्रवाश्यांना तासन्तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यात अडकलेल्या महिला, वृद्ध, लहान मुले यांच्यासह सर्वच प्रवाशांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छतागृहांची सुविधा नाही. त्यामुळे विशेषत: महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे.
द्रुतगती मार्गावर ज्या भागात काम सुरूराहील तेथेच वाहतूक बंद ठेवून हे काम पूर्ण करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ िशदे यांनी दिले होते. कामाचा वेग पाहता हे काम लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. त्यात या मार्गावरील वाहतुकीचे तसेच राष्ट्रीय महामार्गावर वळविलेल्या वाहतुकीचे कसलेही नियोजन नसल्याने नागरिकांना या मार्गावर पैसे घालवून मनस्ताप विकत घ्यावा लागत आहे, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.

प्रवाशांच्या प्रतिक्रिया..

प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्या
‘‘मुंबई-पुणे प्रवासा दरम्यान वारंवार वाहनचालक व प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, तासंतास वाहतूक कोंडीत अडकून पडणाऱ्या प्रवाशांना विशेषत महिलांची प्राथमिक सुविधांच्या अभावी मोठी कुचंबणा होते. शासनाने या मार्गावर इतर राज्यांमधील राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.’’
– सुरेखा जाधव

टोलच्या प्रमाणात सुविधांची वानवा
‘‘मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ज्या प्रमाणात टोल आकारला जातो त्या मानाने काहीच सुविधा प्रवाशांना दिल्या जात नाहीत. मुंबई-पुणे ह्य़ा २ तासांच्या प्रवासात या मार्गावर फुडमॉल वगळता कोठेही पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहनतळ नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. वाहतूक कोंडीत नागरिकांना समस्यांचा मोठा सामना करावा लागत आहे.’’
– गीतांजली चौहान

नियोजनशून्यतेमुळे वाहतूक कोंडीत भर
‘‘टुरिस्टच्या व्यवसायामुळे आम्हाला रोज मुंबई-पुणे हा प्रवास करावा लागतो. या प्रवासात खंडाळा घाट व अमृतांजन पूल भागातील वाहतूक कोंडी आम्हाला नित्याची आहे. मात्र जेव्हापासून द्रुतगती महामार्ग कामांमुळे बंद ठेवण्यात आला आहे, तेव्हापासून या मार्गावर वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्यामुळे द्रुतगती व राष्ट्रीय महामार्गावरुन वाहने चालविणे अवघड झाले आहे. शासनाने व आयआरबी कंपनीने लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे.’’
– भिकाजी अल्हाट