मोबाइलवरील संदेश सुरक्षित, स्मार्ट आणि स्पॅम-मुक्त

पुणे : चिनी अ‍ॅपवरील बंदीच्या पार्श्वभूमीवर सागर बेदमुथा यांनी मोबाइलमधील संदेश सुरक्षित, स्मार्ट आणि स्पॅम-मुक्त ठेवण्यासाठी संपूर्ण भारतीय बनावटीचे ‘मेजो’ हे अ‍ॅप विकसित केले आहे.

सागर बेदमुथा हे पुणेस्थित ऑप्टिनो मोबिटेक या स्टार्टअप संस्थेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी ‘की मेसेजेस’ आणि ‘स्मार्ट ब्रो’ (२०१६) ही अ‍ॅप्स विकसित केली आहेत. ग्राहकांना संदेश सेवेचा सर्वोत्तम अनुभव मिळावा या हेतूने त्यांनी विकसित केलेले ‘मेजो’ हे अ‍ॅप अँड्रॉईड प्ले स्टोअरवर सर्वासाठी मोफत उपलब्ध आहे.

सागर बेदमुथा म्हणाले,‘ मेजो हे केवळ एक मेसेज अ‍ॅप नसून एआय आणि एमएल या अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित अ‍ॅप आहे. हे डाऊनलोड  केल्यानंतर वापरकर्त्यांला येणारे सर्व एसएमएस यामध्ये सुरक्षितरीत्या गाळले जातात. येणाऱ्या प्रत्येक माहितीचे वर्गीकरण केले जाते. बँकेकडून आलेले सर्व संदेश, स्टेटमेंट्स, रिमाइंडर्स हे तारखेप्रमाणे आणि सुटसुटीतरीत्या वापरकर्त्यांला पाहायला मिळतात. मेजो हे अ‍ॅप संपूर्णपणे सुरक्षित असून गोपनीयतेवर आम्ही भर दिला आहे. अ‍ॅप हे खासगीरीत्या ऑफलाइन प्रक्रियेद्वारे संदेशांच्या वर्गीकरणाचे काम करते. यामुळे कोणत्याही काळजीशिवाय ग्राहक हे अ‍ॅप वापरू शकतो.’

सागर बेदमुथा हे मेकॅनिकल इंजिनिअर असून सिटी बँक आणि एचएसबीसी येथे विपणन विभागात कार्यरत होते. २००९ मध्ये त्यांनी ऑप्टिनो मोबिटेक या स्टार्ट अप संस्थेची स्थापना केली. संस्थेतर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘की मेसेजेस’ आणि ‘स्मार्ट ब्रो’ या अ‍ॅप्ससाठी अमेरिकेतील एमआयटी संस्थेच्या टेक्नॉलॉजी रिव्ह्य़ूव्ह इनोव्हेशन पुरस्कारासह नॅसकॉम, नोकिया यांच्यातर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे.