News Flash

डावखुऱ्या मुलांना कलेची विनामूल्य शिकवणी

डावखुऱ्यांच्या न्यायासाठी कला शिक्षकाचा पुढाकार

|| भक्ती बिसुरे

डावखुऱ्यांच्या न्यायासाठी कला शिक्षकाचा पुढाकार

खाताना किंवा लिहायला शिकताना सहजपणे डावा हात वापरणाऱ्या मुलांवर डावखुरेपणाचा शिक्का बसतो. डाव्या हाताचा वापर करण्यापासून परावृत्त करत त्यांना उजव्या हाताचा वापर करण्याची सक्ती देखील केली जाते. हे चित्र बदलण्यासाठी स्वत डावखुरे असलेले कला शिक्षक मनोज साळुंखे यांनी पुढाकार घेतला आहे. डावखुऱ्या मुलांना चित्रकलेचे विनामूल्य शिक्षण देऊन ते डावखुऱ्यांना कलेसाठी प्रोत्साहन देतात.

१३ ऑगस्ट हा दिवस इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे म्हणून साजरा केला जातो. डाव्या हाताचा वापर करणे गैर, डाव्या हाताचा वापर करणाऱ्या व्यक्ती वेगळ्या, असा नकारात्मक विचार दूर करण्यासाठी १९७६ मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

मनोज साळुंखे खडकी येथील आर्मी स्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जन्मत डावखुरे असलेले साळुंखे यांना इतरांनी सक्ती केल्यामुळे अनेक वर्षे ते लिहिताना, खाताना उजवा हात वापरत. मात्र असोसिएशन ऑफ लेफ्ट हँडर्स या संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर डावखुरे असणे अत्यंत नैसर्गिक असल्याची जाणीव त्यांना झाली. त्यानंतर आपला नैसर्गिक कल मान्य करून त्यांनी पुन्हा डाव्या हाताचा वापर करण्यास सुरुवात केली. आजही अनेकांमध्ये डावखुरे असण्याबाबत गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील असलेले साळुंखे आपले वैयक्तिक योगदान म्हणून त्यांच्याकडे चित्रकलेच्या खासगी शिकवणीसाठी येणाऱ्या डावखुऱ्या विद्यार्थ्यांना चित्रकला विनामूल्य शिकवतात.

मनोज साळुंखे सांगतात, लिओनार्दो दा व्हिंची, पिकासो, राफेल तसेच वासुदेव कामत, देवदत्त पाडेकर हे भारतीय चित्रकार डावखुरे तरीही जगप्रसिद्ध आहेत. सचिन तेंडुलकर, युवराज सिंह हे देखील डावखुरे आहेत. डावखुरे असल्याने त्यांच्या प्रगतीत कोणताही अडथळा आला नाही. अनेकदा मूल डावखुरे आहे हे लक्षात येते, तेव्हा पालक हात बांधून ठेवणे, चटके देणे असे प्रकार करतात, ते योग्य नाही. जगाच्या लोकसंख्येपैकी सुमारे सात ते दहा टक्के व्यक्ती डावखुऱ्या आहेत. ही संख्या उजव्या हाताचा वापर करणाऱ्यांच्या तुलनेत अल्प असल्याने डावखुरे असण्याबाबत गैरसमज आहेत, मात्र त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, हे नव्या पिढीतील पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

अनेक वर्षे मी शालेय वयोगटातील मुलांना चित्रकला शिकवत आहे. उजव्या हाताचा वापर असो किंवा डाव्या हाताचा वापर असो, कोणीच, कधीही या कलेत किंवा कोणत्याही क्षेत्रात मागे पडत नाहीत, असा अनुभवही साळुंखे आवर्जून सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 4:54 am

Web Title: international lefthanders day 2019 mpg 94
Next Stories
1 रद्द केलेल्या रेल्वे गाडय़ांचे तिकीट ‘कन्फर्म’!
2 पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
3 पुणे – लग्नास नकार; प्रियकराने अपहरण करुन प्रेयसीवर केले चाकूने वार
Just Now!
X