सेवा सहयोग संस्थेतर्फे जागृती, सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती, वितरणाचा उपक्रम

पुणे : वयामध्ये येणाऱ्या वस्ती पातळीवरील मुलींमध्ये होणारे बदल टिपत त्यांच्याशी संवाद साधून किशोरवयीन मुलींमध्ये एक नवी ‘ऊर्मी’ जागविण्याचे काम सेवा सहयोग फाउंडेशनतर्फे केले जात आहे. ‘मैत्रीण’ या सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती करून या मुलींमध्ये त्याचे वितरण करण्यासाठी साकारलेल्या साखळीतून संस्थेने किशोरी अवस्थेतील मुलींना आत्मविश्वास मिळवून दिला आहे.

महिला सक्षमीकरण क्षेत्रात सेवा सहयोग फाउंडेशनतर्फे काम केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून किशोरी विकास प्रकल्प राबविला जातो. वयामध्ये येणाऱ्या मुलींमध्ये शारीरिक बदल होत असतात. नैसर्गिक प्रक्रिया असलेली मासिक पाळी  किशोरी अवस्थेतील मुलींना केवळ अज्ञानातून त्रासदायक वाटू लागते, असे वस्ती पातळीवर काम करताना जाणवले. मासिक पाळीमध्ये सॅनिटरी नॅपकिन वापरायचे असतात याचीच मुळी कित्येक मुलींना माहिती नव्हती. पुण्यासारख्या शहरामध्ये झोपडपट्टी विभागामध्ये ही परिस्थिती असेल तर या क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता असल्याची जाणीव झाली. त्यातूनच ‘ऊर्मी’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती या प्रकल्पाच्या समन्वयक पल्लवी मित्तल यांनी दिली.

वस्ती पातळीवरील किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जनजागृती, मैत्रीण या सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती आणि रेड डॉट कॅम्पेन अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट अशा तीन स्तरांवर ऊर्मी प्रकल्पाचे काम चालते. इलेक्ट्रॉनिका फायनान्स लिमिटेड या कंपनीने सेवा सहयोग फाउंडेशनला केलेल्या अर्थसाह्य़ातून सॅनिटरी नॅपकिन्स निर्मितीचे यंत्र घेण्यात आले आहे. कर्वे रस्त्यावर सॅनिटरी नॅपकिन्स निर्मितीचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांत एक लाखांहून अधिक सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती करण्यात आली आहे. त्यापैकी ९० हजारांहून अधिक सॅनिटरी नॅपकिन्स अल्प दरामध्ये वितरित करण्यात आले आहेत, असे पल्लवी मित्तल यांनी सांगितले.संस्थेच्या स्वयंसेविका वस्ती पातळीवरील किशोरवयीन मुलींशी संवाद साधतात. आतापर्यंत सहा हजारांहून अधिक मुलींशी संवाद साधून त्यांच्यामध्ये मासिक पाळीमध्ये घ्यावयाची स्वच्छता याविषयीची जागृती घडविण्यात आल्याची माहिती  पल्लवी मित्तल यांनी दिली.

‘रेड डॉट बॅग’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वस्ती पातळीवर जागृती करताना सॅनिटरी नॅपकिन्सच्या विल्हेवाटीबद्दल सजगतेचा अभाव असल्याचे ध्यानात आले. हा कचरा कसाही टाकून दिला जात असल्याचे निदर्शनास आले. ‘स्वच्छ’ संस्थेच्या ‘रेड डॉट कॅम्पेन’पासून प्रेरणा घेऊन सेवा सहयोग फाउंडेशनने ‘रेड डॉट बॅग’च्या निर्मितीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे रेड डॉट बॅग पाहताच स्वच्छ स्वयंसेवकांना कचऱ्याचे वर्गीकरण करणे सुलभ जाते, अशी माहिती पल्लवी मित्तल यांनी दिली.