देशामध्ये असलेली असहिष्णुता नष्ट करण्याचे काम भारतीय राज्यघटनेने केले.. मोदी सत्तेवर आले म्हणून नव्हे तर, लेखन स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याच्या भावनेतून साहित्यिक पुरस्कार परत करीत आहेत.. समता प्रस्थापित करण्याआधी समरसतेच्या गोष्टी हे शीर्षांसन आहे.. बाबूराव बागूल, दया पवार, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर हे दलित लेखक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याच्या योग्यतेचे नव्हते का?.. मानव कल्याणाचा विचार केंद्रस्थानी ठेवूनच साहित्यनिर्मिती करावी लागेल.. हे विचार आहेत ज्येष्ठ विचारवंत आणि सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांचे. ‘सम्यक साहित्य’ संमेलनाला पुण्यात शुक्रवारी (१८ डिसेंबर) प्रारंभ होत आहे. या निमित्ताने ‘लोकसत्ता’ने डॉ. कसबे यांच्याशी संवाद साधला..
प्रश्न : सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकडे आपण कोणत्या परिप्रेक्ष्यातून पाहता?
उत्तर : सम्यक म्हणजे योग्य, संतुलित आणि मध्यममार्ग असा अर्थ होतो. नव्या पिढीचे तरूण जे लिहिते आहेत त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशातून सम्यक साहित्य संमेलन हा विचार पुढे आला. हे संमेलन मध्यममार्गी आहे. जाती-पाती, धर्म आणि प्रदेशाच्या आड येत नाही. संपूर्ण समाजाचा व्यापक विचार करणारे हे संमेलन आहे.
प्रश्न : देशामध्ये असहिष्णू वातावरण आहे का?
उत्तर : देशामध्ये सहिष्णुता होती कधी? देशातील ५० टक्के स्त्रियांना आणि ७८ टक्के लोकसंख्या असलेल्या शुद्रातिशुद्रांना या देशाने शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. ज्या देशामध्ये अस्पृश्यता पाळली गेली तेथे स्हिष्णुता असेलच कशी? ही असहिष्णुता नष्ट करण्याचे काम भारतीय राज्यघटनेने केले. भारतीय राज्यघटनेने दिलेली आधुनिक मूल्ये ही पाश्चिमात्य देशातील प्रबोधनाच्या चळवळीतून मिळालेली आहेत. ही मानवी मूल्ये कोणत्या प्रदेशासाठी किंवा धर्मासाठी नाहीत. तर, मनुष्य जातीसाठी आहेत. देशात मानवी मूल्यांना विरोध होतच होता. ही मूल्ये पश्चिमेकडची असून त्यात आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडत नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये या आधुनिकतेतून आली आहेत. मानवी जीवनाला आधुनिक दृष्टिकोन आणि मूल्ये घटनेने स्वीकारली. बुद्ध-महावीरांनी केलेल्या क्रांतीलाही प्रतिक्रांतीतून उत्तर दिले गेले. हे प्रतिक्रांतिकारक आग्रही आणि आक्रमक होतात. समाजात ढवळाढवळ करून क्रांती नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. ही चळवळ वेगाने वाढली आहे. सामाजिक आणि आर्थिक क्रांतीला वेगवेगळ्या स्तरांतून विरोध होत आहे. घटनेच्या गांधीवादी प्रारूपाला विरोध करताना आंबेडकरांनी या देशाचा नागरिक केंद्रस्थानी ठेवून घटना करायची असल्याचे सांगितले होते. विविध देशांच्या राज्यघटनेतून घेतलेल्या कलमांतून केलेली भारताची घटना ही ठिगळांची गोधडी असल्याची टीका गोळवलकर यांनी केली होती. त्यांना जीवनमूल्ये नको होती. तर, वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्थेचा ढाचा आहे त्याचे पुनरुज्जीवन करायचे होते. त्यातून धर्मवादी चळवळी उभ्या राहिल्या.
प्रश्न : साहित्यिकांचे पुरस्कार परत करण्याचे सत्र बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर थांबले आहे का?
उत्तर : सरकार कोणाचेही येवो समाजातील काही घटकांवर अन्याय होत असतो. ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले ते हिंदूुत्ववादी नाहीत. ते का विरोध करतात याचा विचार झाला पाहिजे. सरकार सत्तेवर आल्यानंतर बिहारमध्ये साहित्यिकाचा खून होतो. हिंदूू धर्मावर लिहायचे नाही तर, चाकोरीतच लेखन करायचे अशा अटी घातल्या जातात. एका लेखकाने तर साहित्यिक म्हणून आपला मृत्यू झाल्याचे जाहीर केले. अशा प्रकारचा संकोच हा सर्जनशीलतेशी संबंधित आहे. या घटनांमुळे आविष्कार स्वातंत्र्याचा संकोच होतो असे साहित्यिकांना वाटणे स्वाभाविकच आहे. मग हे साहित्यिक पुरस्कार परत करण्याखेरीज दुसरे काय करू शकतात. मोदी सत्तेवर आल्यामुळेच पुरस्कार परत केले असा त्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर, शास्त्रज्ञ हे असहिष्णुतेबद्दल बोलत आहेत. आणीबाणीची परिस्थिती नसली तरी लेखकांच्या विचारस्वातंत्र्यावर गदा आली आहे. ही उद्याच्या फॅसिझमची नांदी आहे, असे म्हणले तरी चुकीचे ठरू नये.
प्रश्न : समता आणि समरसता हे समानार्थी शब्द आहेत का?
उत्तर : हा शब्दांचा भुलभुलैया आहे. शब्दच्छल करण्याची परंपरा जुनीच आहे. समता म्हणजे ‘इक्वालिटी’ आणि समरसता म्हणजे ‘इंटिग्रिटी.’ एकजीव होणे, एकात्म होणे म्हणजे समरसता. समाजामध्ये विषमता तशीच ठेवून समरसता कशी साध्य करणार? हे एक प्रकारचे शीर्षांसन आहे. समरसता आल्यावर समता येईल असे समजणे म्हणजे या शब्दच्छलाला बळी पडण्यात अर्थ नाही. ऐहिक जीवनातील प्रश्न हे राज्यघटनेतील कायद्यानुसार सुटले पाहिजेत. समान नागरी कायदा लागू केला तर हिंदू-मुस्लिम यांच्यातील ऐहिक दरी तरी मिटेल.
प्रश्न : वेगवेगळ्या साहित्य संमेलनाच्या स्वतंत्र चुली असाव्यात का?
उत्तर : शिक्षणाच्या प्रसारामुळे बहुजन समाजातील मुले लिहू लागली. यातील सारेच प्रतिभावंत आहेत असे म्हणता येणार नाही. पण, काही लेखक-कवी जागतिक पातळीवरचा विचार करणारे लेखन करीत आहेत. साठोत्तरी कालखंडातील बाबूराव बागूल, दया पवार, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर हे लेखक अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याच्या पात्रतेचे नव्हते का? त्या व्यासपीठावरदेखील सर्वानाच संधी देता येत नाही. त्यातूनच दलित, ग्रामीण, आदिवासी संमेलने सुरू झाली. मात्र, १९९० नंतर आलेल्या जागतिकीकरणामुळे जग बदलले तशा माणसाच्या जाणिवाही बदलल्या. चळवळी तर कालबाह्य़ झाल्या आहेत. त्यामुळे मानव कल्याणाचा विचार केंद्रस्थानी ठेवूनच साहित्याची निर्मिती केली पाहिजे.

मुलाखत: विद्याधर कुलकर्णी