News Flash

इराणी तरुणीला सिगारेटचे चटके, पुण्यातील उद्योगपतीच्या मुलाला अटक; मेसेजमुळे सुटका

परवीन ही शिक्षणासाठी मे महिन्यात पुण्यात आली. नोव्हेंबर २०१८ मध्ये परवीनची एका मैत्रिणीने धनराज मोरारजी (वय ४७) याच्याशी ओळख करुन दिली.

२२ डिसेंबर रोजी धनराज परवीनला घेऊन कोरेगावातील एका हॉटेलमध्ये जेवायला गेला. वॉशरुममध्ये वेळ का लागला, या क्षुल्लक कारणावरुन त्याने हॉटेलमध्येच परवीनला मारहाण केली.

इराणमधील तेहरान येथे राहणारी ३० वर्षांची परवीन घेलिची ही तरुणी सॉफ्टवेअर क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आली, चांगले शिक्षण घेऊन नोकरी मिळवण्याचे तिचे स्वप्न होते, याच दरम्यान परवीनची ओळख धनराज मोरारजीशी झाली, या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले, परवीन आनंदात होती, पण हे प्रेमसंबंध नरकयातना देतील, असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. धनराजने जवळपास दोन महिने परवीनला घरात डांबून ठेवले, तिचा अमानूष छळ केला…अगदी सिगारेटचे चटकेही दिले… अखेर तिने धाडस दाखवत इन्स्टाग्रामवरुन मैत्रिणीला मेसेज केला आणि सोमवारी अखेर परवीनची सुटका झाली.

परवीन ही शिक्षणासाठी मे महिन्यात पुण्यात आली. नोव्हेंबर २०१८ मध्ये परवीनची एका मैत्रिणीने धनराज मोरारजी (वय ४७) याच्याशी ओळख करुन दिली. या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले. धनराजने परवीनला ‘मी तुझी चांगली काळजी घेईन, तुझा आर्थिक खर्चही करेल’, असे सांगितले होते. परवीनलाही धनराज आवडत होता. तिने लगेच धनराजला होकार दिला आणि त्याच्या घरी राहायला गेली.
सुरुवातीचे दोन ते तीन दिवस धनराजने तिला चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर धनराज किरकोळ भांडणातही परवीनला मारहाण करु लागला. त्याने एकदा माझ्या गळ्याला चाकू लावून ठार मारण्याची धमकी दिली, असे परवीनने तक्रारीत म्हटले आहे. धनराज मला कोणाशीही बोलू देत नव्हता, माझ्या मोबाईलवरील कॉल आणि मेसेजकडे त्याचे लक्ष असायचे, मी माझ्या आईशी काय बोलायचे हे देखील तो वाचायचा. यासाठी तो गुगल ट्रान्सलेटरचा वापर करायचा, असे परवीनने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर धनराजने मला सिगारेटचे चटकेही दिले. मारहाण केल्यावर दुसऱ्या दिवशी धनराज माझी माफी मागायचा आणि पुन्हा त्रास देणार नाही, असे सांगायचा. मी देखील त्याच्यावर विश्वास ठेवायचे, असे परवीनने पोलिसांना सांगितले.

२२ डिसेंबर रोजी धनराज परवीनला घेऊन कोरेगावातील एका हॉटेलमध्ये जेवायला गेला. वॉशरुममध्ये वेळ का लागला, या क्षुल्लक कारणावरुन त्याने हॉटेलमध्येच परवीनला मारहाण केली. अखेर हॉटेल व्यवस्थापनाने दोघांनाही बाहेर काढले. घरी आल्यावर त्याने परवीनला एका खोलीत डांबून ठेवले. तिला बेदम मारहाण केली. हा प्रकार असह्य झाल्याने शेवटी परवीनने धाडस दाखवत इराणी मैत्रिणीला मेसेज केला. धनराज हा व्हॉट्सअॅप, फेसबुक वापरत असला तरी तो इन्स्टाग्रामवर फारसा सक्रीय नव्हता. त्यामुळे परवीनने इन्स्टाग्रामचा वापर केला. परवीनचा मेसेज पाहून मैत्रिणीने पुणे मिरर या इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. शेवटी पोलिसांनी सोमवारी परवीनची धनराजच्या घरातून सुटका केली. मी धनराजच्या तावडीतून सुटले, यावर माझा विश्वासच बसत नाहीये, असे परवीनने सांगितले. पोलिसांनी धनराजला अटक केली असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धनराजवर मारहाण करणे, धमकी देणे, डांबून ठेवणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहे धनराज ?

धनराज हा पुण्यातील ख्यातनाम उद्योगपती अरविंद मोरारजी यांचा मुलगा आहे. अरविंद यांचे २००५ मध्ये निधन झाले. धनराजची आई त्याच्या घराजवळच राहते. तर धनराज हा विवाहित असून काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी मुलासह घरातून निघून गेली होती. धनराजला दारुचे व्यसन असल्याचे सांगितले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 2:05 pm

Web Title: iranian woman rescued from industrialist dhanraj morarji house in koregaon park instagram message
Next Stories
1 हिंजवडीत पोलीस ठाण्यात हवालदाराला शिवीगाळ
2 पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याने गाडया फोडल्या
3 महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख आणि पुण्याच्या ‘पर्वती’चं हे कनेक्शन माहितीये का?
Just Now!
X