कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी; करोनामुळे कारागृह प्रशासन चिंतित

पुणे : राज्यातील साठ कारागृहांत विशेषत: पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिक येथील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने कारागृह प्रशासन चिंतित आहे. करोनामुळे कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी किरकोळ गुन्ह्य़ातील कैद्यांना जामीन मंजूर करावा, अशी  शिफारस राज्य कारागृह विभागाकडून न्यायालयाकडे केली आहे. किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्य़ातील कैद्यांना जामीन दिल्यास काहीअंशी कारागृह यंत्रणेवर ताण कमी होईल तसेच करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न करणे शक्य होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

राज्य कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी न्यायालयीन प्रशासनाकडे नुकतीच याबाबतची शिफारस केली आहे. करोनाबाबत कारागृह प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती मंगळवारी रामानंद यांनी दिली. या प्रसंगी कारागृह उपमहानिरीक्षक (मुख्यालय) स्वाती साठे उपस्थित होत्या.

रामानंद म्हणाले, राज्यातील साठ कारागृहांतील बंदीक्षमता २४ हजार आहे. प्रत्यक्षात मात्र राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात ३८ हजार कैदी आहे. कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. पुण्यातील येरवडा कारागृह, मुंबईतील ऑर्थर रोड कारागृह, ठाणे, नाशिक कारागृहात कैद्यांची संख्या जास्त आहे. कारागृहातील कैद्यांना न्यायालयीन सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात येते. करोनामुळे, कारागृह प्रशासनाने यापुढील काळात न्यायालयीन सुनावणीसाठी कैद्यांना व्हिडीओ कॉन्फरिसंग सुविधेद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे कैद्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण काही अंशी कमी होईल.

किरकोळ गुन्ह्य़ातील कैद्यांना तात्पुरता जामीन मंजूर केल्यास कारागृहातील कच्च्या कैद्यांची (शिक्षा न झालेले कैदी) संख्या कमी करणे शक्य होईल. त्यामुळे कारागृहातील यंत्रणेवर पडणारा ताण कमी होईल तसेच त्यामुळे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे शक्य होईल, असे त्यांनी नमूद केले.

कारागृहात विलगीकरण कक्ष

कारागृहात एखादा कैदी किंवा कारागृह रक्षक देखील संशयित वाटल्यास त्याला पुढील वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्वरित वेगळ्या कक्षात ठेवण्यात येईल. पुणे, मुंबई, नाशिक, ठाण्यासह राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांत विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मास्क तसेच सॅनिटायजरचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी सांगितले.