तिहेरी तलाक रद्द करण्याच्या निर्णयामुळे ५० टक्के अल्पसंख्याक समाज सरकारच्या पाठीशी असून ३७० कलम रद्द केल्यामुळे जम्मू आणि काश्मीर हा भाग देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आला आहे. असे मत असे राज्यसभा सदस्य अर्थतज्ज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले. तसेच भाजप हिंदूंचे संघटन करत आहे. तर तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर अल्पसंख्याक समाजाचे विभाजन होत असून, तिहेरी तलाक हे धार्मिक स्वातंत्र्य असले तरी तलाकमुळे स्त्री-पुरुष समानता या राज्यघटनेतील तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचेही त्यांना सांगितले.

विश्वलीला ट्रस्टच्यावतीने अजिंक्य योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३१९ व्या जयंतीनिमित्त राज्यसभा सदस्य अर्थतज्ज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांच्या आर्थिक स्वातंत्र्य आव्हाने आणि संधी या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेशव्यांचे वंशज महेंद्र पेशवा, पुष्कर पेशवा, आमदार मेधा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की,आपल्या देशात सहा दशके मुघलांशी आणि दोन दशके इंग्रजांशी संघर्ष करूनही ८२ टक्के लोकसंख्या हिंदू असल्यामुळे भारत सांस्कृतिकदृष्ट्या हिंदुराष्ट्रच आहे. मात्र, हिंदूंचे विभाजन आणि मुस्लिमांचा अनुनय करून काँग्रेसने राज्य केले. रामजन्मभूमी, कृष्णजन्मभूमी आणि काशी विश्वेश्वर या स्थानांवर हिंदूंचाच अधिकार असून रामजन्मभूमीच्या जागेसंदर्भात सुरू असलेला खटला जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

देशाची आर्थिक परिस्थिती सुधाराण हे देखील कलम ३७० इतकंच महत्वाचे आहे. तर इम्रान खान यांचं कलम ३७० वरील भारताविरुद्धच विधान हे सर्कस मधील एका पात्रा प्रमाणे असून, इम्रान खान नैराश्यामध्ये गेले आहेत असे सांगत राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी  त्यांच्यावर सडकून टीका केली. भारत सरकारने जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याबाबत केलेल्या विधानावर सुब्रमण्यम स्वामी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली.

तसेच, यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांनी देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात  भरमसाठ टॅक्स आणि चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देश आर्थिक मंदीमध्ये गेला असल्याचे सांगत भाजपाला घरचा आहेर दिला. त्यांनी हे देखील म्हटले की अर्थव्यवस्थेला ठीक करायचे आहे मात्र यामध्ये माझा सल्ला घेतला नाही तर मी काय करणार? मात्र त्यांनी हे देखील सांगितले की ,३७० बाबत माझा सल्ला घेतला होत त्याबाबत निर्णय झालेला आहे.