पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाने आज दमदार हजेरी लावली असून खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. तर सायंकाळपासून धरणातून १८ हजार क्युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले असून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. जर असाच पाऊस पडत राहिल्यास रात्री उशीरा २५ ते ३० हजार क्युसेसने पाणी सोडण्यात येणार आहे. अशी माहिती खडकवासला धरणाचे कार्यकारी अभियंता पांडुरग शेलार यांनी दिली. पाणी सोडल्यानंतर नदी पात्रा लगतच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर, खडकवासला, वरसगाव आणि पानशेत या चार ही धरणक्षेत्रात शनिवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोमवारी पावसाचा जोर अधिक वाढल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे पानशेत ७७.४० टक्के (८.२४ टीएमसी), टेमघर ४९.५० टक्के (१.८४ टीएमसी) तर वरसगाव ५०.२९ टक्के (६.४५ टीएमसी) भरल्याने या चारही धरणांमध्ये एकूण सुमारे ६३.४६ टक्के (१८.५० टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. तर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई आणि कोकणात अतिवृष्टीची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज
राज्यातील सर्व भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून यामध्ये कोकण, मुंबई, विदर्भात मुसळधार पाऊस पडला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात बहुतांश ठिकाणी उद्या मुसळधार तर मुंबई आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच पुणे शहरात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.