शालेय पोषण आहाराची जबाबदारी मुख्याध्यापकांवर न ठेवता, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारपासून (२१ ऑगस्ट) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळांमध्ये ‘खिचडी बंद’ आंदोलन करण्याचा निर्णय, पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शाळा मुख्याध्यापक संघाच्यावतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. शालेय पोषण आहार योजनेची जबाबदारी सध्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर आहे. मात्र, पोषण आहारांतर्गत दिल्या गेलेल्या अन्नामधून विषबाधा झाल्याच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर मुख्याध्यापक संघाने ही जबाबदारी नाकारली आहे. याबाबत संघटनेने मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले आहे.
याबाबत पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सरचिटणीस हरिश्चंद्र गायकवाड यांनी सांगितले,‘‘शालेय पोषण आहारामध्ये दिले जाणारे अन्नपदार्थ हे बाहेरून शिजवून आणलेले असतात. त्यावर प्रत्यक्ष लक्ष ठेवणे मुख्याध्यापकांना शक्य नाही. मात्र, त्यामध्ये काही त्रुटी आढळली तर मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाते. आमचा विरोध हा पोषण आहाराला नाही, तर त्याबाबत मुख्याध्यापकांवर लादण्यात आलेल्या जबाबदारीला आहे. त्यामुळे पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांना सोमवारी कल्पना देण्यात येणार आहे. आमच्या मागण्यांबाबत शासनाने वेळीच निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.’’
या बैठकीसाठी पुण्यातील पन्नासहून अधिक शाळांचे मुख्याध्यापक हजर होते. या आंदोलनाबाबत पुढील रूपरेखा ठरवण्याबाबत महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शाळा मुख्याध्यापक संघाची बैठक सोमवारी होणार आहे.