News Flash

कोरेगाव भीमातील हिंसाचार पूर्वनियोजित : रामदास आठवले

कोरेगाव भीमाप्रकरणी आठवलेंचा गंभीर आरोप

पुण्यातील पत्रकार परिषदेत रामदास आठवले

१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा या ठिकाणी उसळलेला हिंसाचार पूर्वनिजोयित होता असा आरोप आता केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सणसवाडीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांना संरक्षण दिले गेले पाहिजे, या संदर्भात ग्रामीण पोलिसांना सूचना केल्या आहेत असेही आठवले यांनी म्हटले आहे. या संपूर्ण हिंसाचारात ९ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अॅट्रॉसिटी कायदा कधीही रद्द होणार नाही. दलितांना आपले मित्र मानून काम करा असाही सल्ला आठवले यांनी दिला. कोरेगाव भीमाची दंगल म्हणजे काही प्रमाणात पोलिसांचे अपयश होते असेही त्यांनी म्हटले आहे.

कोरेगाव भीमा या ठिकाणी १ जानेवारी रोजी हिंसाचार उसळला. त्यानंतर या हिंसाचाराचे पडसाद २ जानेवारीला महाराष्ट्रभर उमटले. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदलाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता आज पत्रकार परिषद घेऊन रामदास आठवले यांनी कोरेगाव भीमा प्रकरण म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. तसेच जिग्नेश मेवाणीला चांगला नेता व्हायचे असेल तर त्याने उलटसुलट भाषण करू नये असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिला आहे.

कोरेगाव भीमा या ठिकाणी उसळलेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता. तर मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि तोडफोड झाली होती. या हिंसाचारामागे हिंदुत्त्ववादी संघटना आहेत असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. संभाजी भिडे गुरुजी यांची शिव प्रतिष्ठान संस्था आणि मिलिंद एकबोटे समस्त हिंदू एकता आघाडी या दोन संस्था आहेत असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले. तसेच महाराष्ट्र बंदची हाक देत या सगळ्या हिंसाचाराचा निषेध नोंदवला.  भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली. आता याच कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी रामदास आठवलेंनी आक्रमक भूमिका घेत हा सगळा पूर्वनियोजित कट होता असा आरोप केला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 5:33 pm

Web Title: koregaon bhima violence was pre planned says ramdas athavale
Next Stories
1 .. तर सेनेचे ५ पेक्षा अधिक खासदार निवडून येणार नाहीत: संजय काकडे
2 …म्हणून रुपाली पाटील यांनी केले शोले स्टाईल आंदोलन
3 ४४ किलोमीटर वर्तुळाकार मार्गावर मेट्रो धावणार
Just Now!
X