19 April 2019

News Flash

वैद्यकीय बिल देण्यासाठी आता रुग्णालयातच कर्ज!

रुग्णालयांचे वैद्यकीय बिल भरण्याचे आव्हान पेलणे रुग्णाच्या नातेवाईकांना अनेकदा साधत नाही.

|| भक्ती बिसुरे

रुग्णालयांचे वैद्यकीय बिल भरण्याचे आव्हान पेलणे रुग्णाच्या नातेवाईकांना अनेकदा साधत नाही. कधी कधी एकरकमी भरमसाठ बिल भरण्याची पाळीही रुग्णाच्या आप्तांवर येते. ही रक्कम कशी उभी करावी, ही चिंताही त्यांना भेडसावत असते. त्यावर मात म्हणून आता वैद्यकीय बिलासाठीचे कर्ज थेट रुग्णालयातच मिळण्याची सोय सुरू झाली आहे.

नवीन घर, वाहनखरेदी किंवा परदेशातील उच्च शिक्षणासाठी कर्ज घेणे ही संकल्पना नवीन नाही. या सुविधेबरोबरच रुग्णालयाचे बिल भरण्यासाठीच्या कर्जाची सोय आता उपलब्ध झाली आहे. आरोग्य सेवा शाखेतून व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेतलेल्या डॉ. सोनिया बसु यांच्या विचारातून ही कल्पना पुढे आली.

सद्य:स्थितीत महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर आणि महाराष्ट्राबाहेर चेन्नई, बेंगळुरु आणि हैदराबाद शहरांमधील सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे. गेल्या वर्षभरामध्ये डॉ. बसु आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या या ‘स्टार्ट अप’ प्रकल्पातून रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी सुमारे साडेतीन कोटी  रुपयांची कर्जे वितरित करण्यात आली आहेत.

डॉ. बसु म्हणाल्या, एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रुग्णालयात काम करत असताना आर्थिक विवंचनेत सापडलेले अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक पाहायला मिळाले. आरोग्य विमा घेण्याबाबत पुरेशी माहिती नसल्याने तसेच त्याचे महत्त्व माहिती नसल्याने अनेक नागरिक वैद्यकीय पेचप्रसंग आला असता मित्र, नातेवाईक यांच्याकडून उसने पैसे घेतात. असे पैसे घेणे ज्यांना शक्य नसते ते उपचार थांबवतात, असेही पाहाण्यात आले. त्या वेळी रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना वैद्यकीय अडचणीच्या काळात कर्जाऊ रक्कम देणारी सुविधा हवी, हे प्रकर्षांने जाणवले. त्यासाठी रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेनुसार दहा हजार रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारे प्रारूप तयार करण्यात आले आहे. त्यासाठी बँका आणि पतपुरवठा करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घेण्यात आली आहे.

या उपक्रमासाठी डॉ. बसु यांना परवेझ हुसैन यांचे सहकार्य लाभले असून अल्प मुदतीची कर्जे शून्य टक्के व्याजदराने तर दीर्घ मुदतीची कर्जे सहा टक्क्य़ांपर्यंत व्याजदराने देण्यात आली आहेत. रुग्णालयाचे पैसे भरण्यासाठी कर्ज देण्याची संकल्पना सुरू होताच तिला सर्व आर्थिक गटांतून चांगला प्रतिसाद लाभला. पहिल्या टप्प्यात अल्पावधीत सात ते आठ लाख रुपये कर्ज देण्यात आले. त्यानंतर २०१८ या वर्षांमध्ये देण्यात आलेल्या कर्जाची रक्कम सुमारे साडेतीन कोटी रुपये एवढी आहे. त्यामुळे अद्यापही आरोग्य विमा काढण्याबाबत नागरिक पुरेसे जागरूक नसल्याचे निरीक्षण हुसैन यांनी नोंदवले.

कर्ज कसे मिळवावे?

पुणे शहरातील रुबी हॉल क्लिनिक, जहांगिर, संचेती, सह्य़ाद्री, केईएम, पूना हॉस्पिटल, नोबल हॉस्पिटल अशा सर्व खासगी रुग्णालयांमध्ये ‘हेल्थफिन’तर्फे कर्ज मिळवण्याची सुविधा उपलब्ध आहे. इतर शहरांतील नागरिकांना हेल्थफिनच्या संकेतस्थळावर (हेल्थफिन डॉट कॉम) भेट देऊन संलग्न रुग्णालयांची माहिती मिळवणे किंवा कर्ज मिळविण्यासाठी नावनोंदणी करणे शक्य आहे.

कर्ज योजनेचे वैशिष्टय़

  • मुंबई, पुणे आणि नागपूर येथील रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध
  • अल्प आणि दीर्घ मुदत प्रकारात कर्ज मिळते
  • शून्य ते सहा% एवढे अल्प व्याज
  • रुग्णाला दहा हजारांपासून पाच लाखांपर्यंत आवश्यक रक्कम तातडीने देण्याची सोय

First Published on December 7, 2018 12:47 am

Web Title: loans for hospitals