पुणे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व भागांमध्ये आता पेट्रोल-डिझेलचा पूर्वीसारखाच पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आता आपल्या वाहनांसाठी पेट्रोल-डिझेल मिळू शकणार आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबत सुधारित आदेश जारी केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, पुणे जिल्ह्यातील पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे, खडकी व देहूरोड छावणी, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि पुणे ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रांमध्ये पेट्रोल-डिझेल पंप चालकांनी येणाऱ्या सर्व वाहनांना ओळखपत्राची मागणी न करता सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेमध्ये पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करावा, असे म्हटले आहे.

करोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता १७ मेपर्यंत देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, आजपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांना पेट्रोल आणि डिझेलचे वाटप केले जात होते. मात्र, आता जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र सोडून इतर सर्व भागातील पेट्रोल पंप खुले होणार आहेत.