पुणे शहरात वाढत्या करोना रुग्णांची संख्या, ही प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर 13 ते 23 जुलै दरम्यान कडक लॉकडाउन जाहीर केला आहे. या लॉक डाउनला व्यापारी महासंघाचा विरोध असून करोनावर लॉक डाउन हे औषध होऊ शकत नाही, अशी भूमिका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी पुणे शहराच्या लॉक डाउनवर मांडली.

यावेळी फत्तेचंद रांका म्हणाले की, पुणे शहरात 30 हजाराहून अधिक व्यापारी आहेत. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर तीन महिने लॉक डाउनला सर्व व्यापारी आणि नागरिकांनी देखील सहकार्य केले. त्यानंतर प्रत्येक दुकानदाराने दुकाने सॅनिटायझ केली. खरेदीसाठी येणार्‍या प्रत्येक ग्राहकाचे स्क्रीनिंग करण्याची व्यवस्था केली आहे. व्यापार सुरळीत चालण्यासाठी प्रशासनाकडून शहरात p1 आणि p2 अशा पद्धतीने दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली गेली आहे. यामुळे आम्हाला 15 दिवस दुकाने सुरू ठेवावी लागतात. मात्र कामगारांना महिन्याचा पगार द्यावा लागत असून व्यापारी वर्ग खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा कठिण काळात तरी सरकारने मदत करण्याची मागणी त्यांनी केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, आता पुण्यात लॉकडाउनच्या घोषणेमुळे व्यापारी वर्गाला आणखी संकटांना सामोरे जावे लागणार आहे. आम्ही कसे जगायचे? असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ते पुढे म्हणाले की, हा आजार आणखी वर्षभर तरी राहील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे करोनावर लॉकडाउन हा पर्याय होऊ शकत नाही. अर्थकारणाला गती देण्याच्या दृष्टीने, दुकाने सुरू राहिली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

तसेच, जे नागरिक नियमांचे पालन करीत नाहीत, अशा नागरिकांवर कारवाई केली पाहिजे. पण हे होताना दिसत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच शासनाकडून येणार्‍या नियमाचं पालन करून आजही दुकाने सुरू ठेवली आहेत आणि भविष्यात देखील सुरू ठेवू. पण आता जाहीर करण्यात आलेल्या पुन्हा लॉक डाउनला आमचा विरोध असून, या निर्णयाचा आम्ही निषेध व्यक्त करीत असल्याचेही त्यांना सांगितले.