लोकसभा निवडणुकीसाठी पुणे शहरात उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला आहे. पहिल्या दोन तासांत सुमारे १२ ते १५ टक्के मतदान झाले आहे. अभिनेता सुयश टिळकनेही पुण्यात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्याने चाहत्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला.

‘आज मतदानादिवशी मी वेळ काढून माझा मतदाना हक्क बजावला आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या मतदानकेंद्राची माहिती घ्या आणि मतदान करा. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण इथून पुढे आपण आपला नेता निवडत असतो. आपल्या आजूबाजूला कशा पद्धतीची प्रगती हवी ते ठरवत असतो आणि हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे. घरी बसला असाल तर बाहेर पडा आणि मतदान करा,’ असं आवाहन त्याने केलं आहे.

सुयश टिळकसोबतच अभिनेता सुबोध भावे, सागर देशमुख, गायिका आर्या आंबेकर यांनीसुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे.

पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून सोमवारी पूर्ण करण्यात आली. पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या २० लाख ७४ हजार ८६१ असून एक हजार ९९७ मतदान केंद्रे आहेत.