मावळ मतदारसंघात मतदानाकरीता बराच उत्साह ओसंडून वाहत होता, जो तो आपले कर्तव्य बजावण्यास आघाडीवर होता, याचा प्रत्यय पनवेल परिसरातील खांदा वसाहती आला, आजच लग्न असलेल्या नवरदेवाने आधी लगीन व मतदानाचे मग माझे ही भूमिका घेत मतदान केले. नवरदेवाचा हळदीच्या अंगातील अवतार पाहून निवडणूक अधिकारी व कर्मचारीही व येणारे नागरिक नवरदेवाकडे कुतूहलाने पाहत होते.
लोकसभा निवडणूकांच्या चौथ्या टप्प्याने मतदान आज पार पडले .

पनवेल विधानसभा मतदारसंघात सकाळपासून मतदानाचा उत्साह मोठ्या प्रमाणावर ओसंडून वाहत होता, सकाळी ११च्या सुमारास पनवेल परिसरातील खांदा वसाहतीतील महात्मा स्कुलमधील मतदान केंद्रावर अजिंक्य डावलेकर हा तरुण मतदान करण्यासाठी आला. अंगाला हळद, पेहराव हळदीने माखलेला, डोक्यात हळदीची टोपी व कपाळावर बांधलेल्या रूईच्या फुलांच्या मुंडावळ्या यामुळे अजिंक्य सगळ्यांचे लक्ष वेधुन घेत होता. खांदा वसाहती मधिल सेक्टर -१ येथील सुयोग अपार्टमेंट येथे राहतो, एकीकडे घर पै-पाहुण्यांनी भरलं होत, मात्र त्याची तमा न बाळगता त्याने थेट मतदान केंद्र गाठले आणि आपला मतदानाचा हक्का बजावला.

आज २९ एप्रिलला सोमवारी सायंकाळी श्वेता या मुलीशी अजिंक्य विवाहबध्द होणार आहेत. मतदानाचा हक्क बजावल्यावर मतदार आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यांनी त्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

‘कोणत्याही परिस्थितीत आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, खरे पाहता हळदीच्या अंगाने वर किंवा वधू घरा बाहेर पडत नाहीत, मलाही मज्जाव करण्यात आला, मात्र सर्वांत प्रथम मतदान मग बाकी इतर गोष्टी म्हणून मी मतदानासाठी हळदीच्या अंगाने बाहेर पडलो. अशी प्रतिक्रिया मतदान बजावल्यानंतर अजिंक्य डावलेकर (वर) यांनी दिली.