News Flash

लोणावळा : भुशी धरण ओव्हर फ्लो; पर्यटकांना मात्र बंदी

नियम डावलून धरणावर कोणी गेल्यास कडक कारवाई होणार

लोणावळा : संततधार पावसामुळे यंदा भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना येथे जाण्यास बंद घालण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच काळात येथे पर्यटकांची वर्षाविहारासाठी तुडूंब गर्दी होती.

लोणावळ्यातील पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे भुशी धरण हे ओव्हर फ्लो झाले असून पायऱ्यांवरून पाणी वाहात आहे. लोणावळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. दरवर्षी पर्यटक भुशी धरण ओव्हर फ्लो होण्याची वाट पाहात असतात. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर इथं वर्षाविहार करण्यास पर्यटकांना सक्त मनाई आहे.

जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश झुगारुन जर कोणी वर्षाविहारासाठी भुशी डॅमवर आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे लोणावळा शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना स्पष्ट सांगितले. दरवर्षी पर्यटकांनी गजबजून जाणार भुशी धरणाचा परिसर यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर शुकशुकाट दिसत आहे.

दरवर्षी लोणावळा शहराच्या अगदी जवळच असलेले भुशी धरण ओव्हर फ्लो होण्याची पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील पर्यटक वाट पहात असतात. परंतु, यावर्षी करोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने लोणावळा परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, जून महिन्यापासून लोणावळा परिसरात आत्तापर्यंत ६४९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे आज शनिवारी दुपारी भुशी धरण तुडुंब भरले असून पायऱ्यांवरून पाणी खळखळून वाहात आहे. गतवर्षी भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्याचे सजताच अनेक पर्यटक गर्दी करत. यावर्षी मात्र पर्यटकांना मज्जाव असल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.

“करोनाचा धोका कायम असल्याने भुशी धरणावर पर्यटकांनी येऊ नये. पर्यटन बंदीचा नियम डावलून इथं येणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिक आणि इतर शहरातील पर्यटकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन लोणावळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 8:14 pm

Web Title: lonavla bhushi dam overflow but tourists are banned here aau 85 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुरंदर मध्ये करोना रुग्णांची संख्या १०१
2 पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण
3 Coronavirus : पुण्यातील रेड लाईट एरियातील एक हजाराहून अधिक महिला गावी परतल्या
Just Now!
X