विवाहाचे प्रमाणपत्रही त्वरित

पुणे : विवाहाचे बंधन गुंफताना पारंपरिक पद्धतीने मुहूर्त पाहून विवाह करण्याबरोबरच प्रेम दिवस अर्थात व्हॅलेन्टाइन डे आणि अन्यही काही खास विशेष दिवस तरुणाई शोधत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ फेब्रुवारी या प्रेमदिनाचे औचित्य साधत पुण्यातील ८३ वधू-वर नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाले.

पत्रिका आणि मुहूर्त पाहून विवाह करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्याबरोबरच नोंदणी पद्धतीने विवाह (रजिस्टर्ड मॅरेज) करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. नवी पिढी पत्रिकेवर फारसा विश्वास ठेवत नसल्याने आपल्या सोयीप्रमाणे विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह केला जातो. या कार्यालयात नोंदणी करून होणारे विवाह विशेष विवाह कायद्यानुसार होतात. त्यामध्ये जात, धर्माचा अडथळा नसतो. विवाहाच्या वेळी किचकट प्रक्रिया नसल्याने नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचे प्रमाण वाढत आहे.

‘१४ फेब्रुवारी २०२०’ हा प्रेमदिनाचा मुहूर्त साधत शहरातील ८३ वधू-वर विवाहबद्ध झाले. पुणे कार्यालयाचे विवाह अधिकारी भालचंद्र पोळ यांनी ही माहिती दिली. विवाह नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोटीस आणि त्यासाठी आवश्यक पुराव्यांची कागदपत्रे जमा केल्यानंतर ३० दिवसांच्या आत कोणत्याही प्रकारचा आक्षेप न आल्यास वधू आणि वर तीन साक्षीदारांसमक्ष अधिकाऱ्यांसमोर विवाह करू शकतात. विवाहाचे प्रमाणपत्रही लगेच देण्याची व्यवस्था दुय्यम निबंधक   कार्यालयात करण्यात आली आहे. मुंबई, मुंबई उपनगर आणि पुणे अशा तीन जिल्ह्य़ांसाठी स्वतंत्र विवाह नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

नोटीस देण्याची प्रक्रिया ऑनलाइन

विशेष विवाह कायदा १९५४ अनुसार नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्या वधू-वरांना नियोजित विवाहाची नोटीस देणे तसेच वय व रहिवास याबाबत ऑनलाइन नोटीस देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून गेल्या वर्षी १ ऑगस्टपासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. विशेष विवाह नोंदणीसाठी नियोजित वधू आणि वराला विवाह नोंदणी अधिकाऱ्याकडे नोटीस देण्यासाठी आणि ३० दिवसांनंतर विवाहासाठी, अशा दोन कामांसाठी जावे लागते. त्यामुळे नोटीस देण्याची संपूर्ण प्रक्रिया नियोजित वर किंवा वधू यांना विवाह नोंदणी अधिकारी कार्यालयात न जाता कोणत्याही ठिकाणावरून ऑनलाइन करता येण्याची सुविधा १ नोव्हेंबर २०१७ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यासाठी http://www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘मॅरेज रजिस्ट्रेशन सव्‍‌र्हिसेस’ या पर्यायावर गेल्यानंतर ‘पीडीई’ हा पर्याय निवडून प्रक्रिया करता येते.