20 September 2018

News Flash

पालखीतळांची विकासकामे यंदाही रखडली

पाऊस पडण्याआधी पालखीतळांवर मुरुम टाकण्याचे आदेश विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आले आहेत.

तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ांतर्गत निधी मंजूर होऊनही कामे नाहीत

HOT DEALS
  • Honor 7X 64 GB Blue
    ₹ 15375 MRP ₹ 16999 -10%
  • Honor 8 32GB Pearl White
    ₹ 12999 MRP ₹ 30999 -58%
    ₹1500 Cashback

पालखीतळांसाठी राज्य शासनाकडून तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ांतर्गत निधी मंजूर होऊनही जिल्ह्य़ातील विविध पालखीतळांवर करण्यात येणारी विविध विकासकामे यंदाही रखडली आहेत. कमानी उभारणे, संरक्षण भिंती बांधणे आदी कामे पावसाळ्यापूर्वी करणे शक्य नाही. त्यामुळे ही कामे थांबविण्यात आली आहेत, तर पाऊस पडण्याआधी पालखीतळांवर मुरुम टाकण्याचे आदेश विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आले आहेत.

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर तसेच सोपानकाका या तिन्ही पालख्या अनुक्रमे देहू, आळंदी तसेच सासवड येथून पंढरपूरकडे रवाना होत असतात. ज्या गावांमध्ये पालखी मुक्काम असतो. त्या ठिकाणच्या पालखीतळांवर अनेक वर्षांपासून सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने वारकऱ्यांचे हाल होत असतात. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने पालखीतळांचा विकास करण्याचे धोरण निश्चित केले. त्यानुसार प्रत्येक पालखीतळाच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या निधीतून पालखीतळांना संरक्षित भिंती बांधणे, कमान आणि पालखी कट्टा बांधणे, पालखी मार्गाचे मुरुमीकरण करणे अशी विविध कामे करण्यात येणार आहेत.

‘पालखीतळांवर कमानी बांधणे, संरक्षण भिंती उभारणे आदी कामे पावसाळ्यापूर्वी करणे शक्य नसल्याने ही कामे थांबवली आहेत. तसेच पालखी तळांवर मुरुम टाकण्याच्या कामांवर लक्ष देऊन ही कामे पूर्ण करावीत, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत’, अशी माहिती तीर्थक्षेत्र विकास आराखडा विशेष कार्यकारी अधिकारी उत्तम चव्हाण यांनी दिली.

तत्कालीन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली १५ मे २०१७ रोजी तीर्थक्षेत्र विकास कार्यकारी समितीची बैठकही पार पडली होती. मागील वर्षी मे महिन्यात पुणे विभागातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्य़ातील पालखीतळांच्या पहिल्या टप्प्यातील कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येऊन दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. जिल्ह्य़ातील बावीस पालखीतळांपैकी तेरा कामांना मंजुरी मिळाली असून त्याबाबतच्या निविदा लवकरच काढण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आली होती. तसेच पालखीतळांचा विकास करण्यासाठी नियमानुसार निविदा मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात काढण्यात येणार होत्या. मात्र, तोपर्यंत पालख्या मार्गस्थ होणार ही बाब लक्षात घेऊन पुणे विभागातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्य़ातील पालखीतळांवर पहिल्या टप्प्यात मागणीनुसार मुरुम टाकून सपाटीकरण करण्यात आले होते. परंतु, यंदाही पालखीतळांच्या कामांसाठी मुहूर्त मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

विसावा व मुक्काम  मिळून ३६ ठिकाणे

पुणे जिल्ह्य़ात २२ मुक्काम आणि दोन रिंगण, सातारा जिल्ह्य़ात चार मुक्काम आणि एक रिंगण व सोलापूर जिल्ह्य़ात १० मुक्काम आणि पाच रिंगण असे एकूण ३६ पालखी मुक्काम आणि आठ रिंगण सोहळे होतात. त्यापैकी पुण्यातील तेरा, साताऱ्यातील तीन आणि सोलापुरातील पाच पालखीतळ विकास कामांना मागील वर्षी मंजुरी देण्यात आली होती.

First Published on June 13, 2018 2:36 am

Web Title: maharashtra government pandharpur wari palkhi sohala