केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. पॉप स्टार रेहानाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यापासून या आंदोलनाबाबत जगभरात चर्चा सुरू झालीये. रेहानाच्या ट्विटनंतर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली असून जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग पॉर्नस्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना भारत सरकारवर टीका केली. त्यावर, आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करु नका अशा शब्दात अनेक भारतीय सेलिब्रिटिंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सेलिब्रिटींना एक सल्ला दिला आहे. ‘भारतीय नागरिक म्हणून मी कलाकारांच्या मतांचा आदर करतो. भारतीय कलाकार सांगताहेत की हा आमच्या देशाचा अंतर्गत मुद्दा आहे. मग तुम्ही तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला. तुमच्या देशाचा प्रश्न आहे तर आधी तुम्ही बोलते व्हा. मग परदेशातील कलाकारांना बोला,’ असा सल्ला भुजबळांनी दिला आहे. पुण्यात बोलताना छगन भुजबळ यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

धर्माबद्दल बोलताना शब्दांच्या बाबतीत जागरूक राहणे गरजेचे :

यावेळी बोलताना एल्गार परिषदेत शरजील उस्मानीने जे वादग्रस्त विधान केले त्यावर भुजबळ म्हणाले की, “त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा ते कायदेतज्ज्ञ ठरवतील. माझं एकच मत आहे की, प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. परंतु एखाद्या धर्माबद्दल बोलताना शब्दांच्या बाबतीत जागरूक राहणे फार गरजेचे आहे. आपण कोणते शब्द वापरतो याचा विचार करणं आवश्यक आहे. टीका करा पण दुसर्‍या धर्मियांना दुःख होणार नाही आणि क्रोध येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच शरजीलला मनुवादाबद्दल बोलायचं होतं असं म्हणत असतील पण आम्हीही मनुवादाबद्दल बोलतो, पुस्तक जाळतो. पण त्याने जे वेगळे शब्द वापरले त्यामुळे गदारोळ निर्माण झालेला आहे. यापुढे सर्वांना माझं एकच आवाहन आहे. एकमेकाच्या धर्मावर टीका करायला किंवा त्यावर चर्चा करायला बंधन असावं असं वाटत नाही. पण त्याला मर्यादा असणं आणि शब्दाचा योग्य वापर करण्याची गरज आहे. जेणेकरून कोणी दुखावणार नाही. वादग्रस्त कोणीच बोलू नये आणि पोलिस योग्य तो निर्णय घेतील”.

कविता राऊत यांच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली :

कविता राऊत यांच्या नोकरीबद्दल विचारलेल्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की, कविता राऊत यांना एका विशिष्ट पदावर जायचे आहे. त्या संदर्भात सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली आहे.

तुम्हाला वाटतं का मुनगंटीवार पक्ष सोडतील? :

भुजबळ यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले की, मुनगंटीवार मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, माजी मुख्यमंत्री फडणवीसही भेटू शकतात. त्यांना कोणीही भेटू शकतं. मुख्यमंत्री हा राज्याचा मुख्यमंत्री असतो. त्यामुळे त्यांना भेटण्यात वावगं अस काय आहे? असं भुजबळ म्हणाले. पुढे बोलताना, तुम्हाला असं वाटतंय का मुनगंटीवार येतील…ते पक्ष सोडतील? अशी उलट विचारणा करुन भुजबळांनी पत्रकारालाच गुगली टाकली. तसेच त्याबाबत मुनगंटीवारांनाच विचारा असंही भुजबळ हसत हसत म्हणाले.