News Flash

करोनाच्या उपचारासाठी मुंबईप्रमाणे पुण्यात तातडीने अधिकची व्यवस्था उभी करा : अजित पवार

कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, बेड व डॉक्टर याबाबतच्या व्यवस्थापनात संगणकीकरण करण्याचे निर्देश

करोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. पुणे जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच करोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे  नियोजन संगणकीय प्रणालीव्दारे करा. तसेच पुणे व पिंपरी चिंचवड येथे मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवार) दिले.

शासकीय विश्रामगृह येथे करोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. बैठकीला  मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,  पुणे शहरासह जिल्ह्यात करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे, करोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, तसेच संस्थात्मक क्वारंटाईन ठिकाणी आवश्यक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात.

तसेच, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात मुंबईत प्रशासनाला यश आले आहे, त्याच धर्तीवर पुण्यात उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, हॉस्पीटलचे बेड व्यवस्थापन, डॉक्टरचे नियोजन या सर्व महत्वाच्या उपाययोजनांचे संगणकीय प्रणालीच्या मदतीने नियोजन करा, त्यामुळे नियोजनात आणखी सुसुत्रता येईल. कंटेनमेंट झोननिहाय उपाययोजनांची पाहणी करा तसेच पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण क्षेत्र  मिळून एकाच पातळीवरून नियोजन करा, करोना संसर्ग रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत उपचाराची गरज असलेल्या नागरिकांना उपचार मिळालेच पाहीजेत, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.

प्रारंभी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबईत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती यावेळी दिली. मुंबईत कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्था, बेड व्यवस्था, तसेच डॉक्टरांचे नियोजन करण्यावर भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण, कोरोनामुक्त झालेले रुग्ण तसेच कोरोना संसर्ग विषयक सद्यस्थिती, आरोग्य सुविधा आणि उपलब्ध सामग्रीबाबतही माहिती दिली. पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत यावेळी माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 3:26 pm

Web Title: make immediate arrangements for treatment of corona in pune like in mumbai ajit pawar msr 87 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुणेकरांची चिंता वाढली; दररोज वाढणाऱ्या करोना रुग्णसंख्येत मुंबईच्या पुढे
2 पुण्यात लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांना समज देण्यासाठी अवतरले ‘यमराज’
3 पुणे : मेजर जनरल पी. व्ही. सरदेसाई यांचे निधन
Just Now!
X