घातक संसर्गजन्य रोग पसरवणारे जीवाणू कोणत्याही प्रतिजैविक औषधाला दाद देईनासे झाले तर..? ही कल्पनाच हादरवून सोडणारी आहे, कारण तसे झाले तर हे जीवाणू धुमाकूळ घालतील आणि त्यांच्यामुळे पसरणाऱ्या साथी आटोक्यात आणणेही मुश्किल होईल. ही कल्पना प्रत्यक्षात आणू शकणारे जीवाणू अर्थात ‘सुपरबॅक्टेरिया’ भारतात मोठय़ा प्रमाणात निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे. औषधनिर्मितीमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रिया प्रकल्पांमध्ये अशा घातक जीवाणूंची निर्मिती होत असल्याचे पुण्यातील राष्ट्रीय पेशी संसोधन संस्थेच्या (एनसीसीएस) संशोधकांनी दाखवून दिले आहे. याबाबतचा प्रबंध ख्यातनाम आंतरराष्ट्रीय नियतकालिक ‘प्लोस वन’ मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
हैदराबादजवळील पतनचेरू हे औषधनिर्मितीचे देशातील सर्वात मोठे केंद्र आहे. तेथील ९० औषध उत्पादक प्रकल्पांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर ज्या ठिकाणी प्रक्रिया होते, तेथील नमुने तपासल्यानंतर ‘एनसीसीएस’ च्या संशोधकांना अनेक धक्कादायक बाबी आढळल्या आहेत. या अभ्यासकांनी एकूण ९३ प्रकारचे जीवाणू तपासले. त्यांचा सध्या वापरात असलेल्या ३९ प्रतिजैविकांवर (अँटिबायोटिक्स) नेमका काय प्रभाव पडतो, हे त्यांनी शोधले. ‘एनसीसीएस’ चे नचिकेत मराठे, विडूथलई, संदीप वाळुजकर, शक्ती सिंग, डॉ. योगेश शौचे तसेच, स्वीडनमधील प्रसिद्ध अभ्यासक एडवर्ड मूर व इवॉकिम लार्सन यांनी मिळून हा अभ्यास केला.
तपासलेल्या जीवाणूंपैकी निम्म्याहून अधिक जीवाणूंनी ३९ पैकी २९ औषधांना न जुमानण्याचे गुणधर्म आत्मसात केले आहेत. त्यात पेनेसिलिन, अ‍ॅम्पेसिलिन, अ‍ॅजिथ्रोमायसिन, एरिथ्रोमायसिन, सिप्रोक्लोक्सॅसिन अशा अनेक प्रतिजैविकांचा समावेश आहे. या प्रकल्पातील ‘ऑक्रोबॅक्ट्रम इंटरमिजियम’ हा जीवाणू तर इतका घातक बनला आहे की, त्याने ३९ पैकी ३८ प्रतिजैविकांना दाद न देणारे गुणधर्म आत्मसात केले आहेत. या जीवाणूमुळे हगवण (डायरिया), अल्सर यांचा संसर्ग होऊ शकतो. दुसरा जीवाणू ‘प्रोव्हिडेन्शिया’ याने या प्रकल्पात ३९ पैकी ३५ प्रतिजैविकांना न जुमानण्याचे गुणधर्म आत्मसात केले आहेत. त्याच्यामुळे हगवण तसेच मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो. या दोन्ही जीवाणूंमध्ये मूलत: केवळ १८ किंवा त्यापेक्षा कमी प्रतिजैविकांवर मात करण्याचे गुणधर्म आहेत. त्यांनी इतर गुणधर्म या प्रकल्पात आत्मसात केले आहेत.
सुपरबॅक्टेरियांच्या निर्मितीचे कारण
औषधनिर्मिती प्रकल्पांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात प्रतिजैविकांचे प्रमाण प्रचंड असते. खरेतर या सांडपाण्यात लिटरमध्ये केवळ काही नॅनोग्रॅम इतक्याच प्रमाणात प्रतिजैविक असण्यास परवानगी असते. प्रत्यक्षात मात्र या सांडपाण्यात त्यांचे प्रमाण ३० मिलिग्रॅमपर्यंत (सुमारे दहा लाख पट जास्त) आढळले आहे. इथे वेगवेगळे जीवाणू एकत्र येतात. ते जगण्यासाठी जीवाणू स्वत:मध्ये बदल करून घेतात. विशेष म्हणजे इथे जीवाणूंनी एकमेकांचे गुणधर्मही आत्मसात केले आहेत. त्यामुळे ते प्रतिजैविकांना दाद देत नाहीत.
याचे धोके काय?
प्रक्रिया प्रकल्पातून हे पाणी नदीत सोडले जाते. असे जीवाणू नदीच्या पाण्याद्वारे माणसाच्या संपर्कात येऊ शकतात. त्यांच्यामुळे संसर्ग पसरला तर त्यावर सध्या अस्तित्वात असलेल्या प्रतिजैविकांची मात्रा लागू पडणार नाही. ते माणसाच्या पोटात गेल्यावर तेथील इतर जीवाणूंमध्येही औषधांना दाद न देण्याची क्षमता येऊ शकते. हैदराबादप्रमाणेच गोवा व देशाच्या इतर भागातही औषधनिर्मिती प्रकल्प आहेत. या सर्वच ठिकाणी असे घातक जीवाणू निर्माण होऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malignant super bacteria production centre in country
First published on: 12-11-2013 at 02:52 IST