पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा निश्चित झाला आहे. मात्र, अद्याप अधिकृत दौरा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजशिष्टाचार विभागाला शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाला नव्हता. पंतप्रधानांचे विशेष सुरक्षा पथक (एसपीजी) शहरात दाखल झाले आहे. विशेष सुरक्षा पथकाकडून सभेच्या ठिकाणचे तसेच पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे, त्या मार्गाची पाहणी करण्यात येत आहे. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी हे सोमवारी सकाळी महायुतीचे उमेदवार भाजपचे उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड येथे जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते पुण्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर महायुतीचे उमेदवार भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ रेसकोर्स येथील मैदानात जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांची शहरात वाहनातून प्रचारफेरी (रोड शो) होणार आहे. मात्र, या प्रचारफेरीचा मार्ग अद्याप राजशिष्टाचार विभागाला पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत कळविण्यात आलेला नाही. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच राजभवन येथे रवाना होणार आहेत.

हेही वाचा…पुणे लोकसभा : पराभवाच्या भीतीपोटी रविंद्र धंगेकर हे आरोप करीत आहे – भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर

मंगळवारी सकाळी पंतप्रधान मोदी हे सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे रवाना होणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक बंदोबस्ताची आखणी करत आहेत. याशिवाय राजशिष्टाचार विभागात पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त राजशिष्टाचारासाठी खास अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा…पुढील वर्षीच्या विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक युपीएससीकडून जाहीर; नागरी सेवा परीक्षा कधी होणार?

आचारसंहिता काळातही पंतप्रधानांचा राजशिष्टाचार कायम

सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, या काळातही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना राजशिष्टाचार कायम असतो. या महत्त्वाच्या व्यक्तींना (व्हीआयपी) आचारसंहिता काळातही राजशिष्टार पुरविण्यात येतो.