ग्राहकांच्या हिताचे विविध नियम अनेकदा नागरिकांना माहित नसतात, त्यामुळे काहींचे फावते. पण, सजगपणे नियमांवर बोट ठेवून लढा दिला, तर विजय निश्चितच असतो. अशाच प्रकारचे वरवर किरकोळ वाटणारे, पण समाजाला मोठी शिकवण देणारे प्रकरण पुण्यात घडले. केवळ तीनशे रुपयांसाठी एका तरुणाने बँकेविरुद्ध सजगपणे लढा दिला.. बँकेने अनेकदा त्याला धुडकावूनही लावले, पण नियमांवर बोट ठेवून त्याचा लढा सुरूच राहिला. अखेर बँकेला नमते घ्यावे लागले व तीनशे रुपयांच्या प्रकरणी नुकसान भरपाई म्हणून या तरुणाला तब्बल नऊ हजार सहाशे रुपये बँकेला देणे भाग पडले!
पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या श्रीकांत येरुळे या तरुणाच्या बाबतीत हा प्रकार घडला. श्रीकांतने जुलै महिन्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या शनिवार वाडय़ाजवळील एटीएम केंद्रातून तीनशे रुपये काढण्याचा प्रयत्न केला. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. बँकेच्या खात्यातून तीनशे रुपये कापलेही गेले, पण एटीएममधून त्याला पैसे मिळाले नाहीत. घटनेनंतर दोनच दिवसांनी त्याने बँकेच्या शाखेत जाऊन त्याबाबत रीतसर तक्रार नोंदवली. त्यानंतर वारंवार तो बँकेत जाऊ लागला, पण चौकशी सुरू आहे, अशाच उत्तरासह विविध कारणे त्याला सांगितली जात होती. मात्र, त्याने पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यानंतर तब्बल चार महिन्यांनी त्याच्या खात्यामध्ये तीनशे रुपये बँकेने जमा केले.
तीनशे रुपये जमा झाले, पण श्रीकांत इतक्यावर थांबला नाही. माहिती- अधिकाराच्या विविध सत्रात त्याने भाग घेतला होता. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने घालून दिलेला एक नियम त्याला माहीत होता. या नियमानुसार अशा प्रकारे ग्राहकाला पैसे न मिळाल्यास पुढील सात दिवसांच्या आत संबंधित ग्राहकाला ते पैसे परत करणे अपेक्षित आहे, अन्यथा सात दिवसानंतर बँकेला दररोज शंभर रुपये दंड लावला जातो. श्रीकांतने दुसऱ्याच दिवशी बँकेत जाऊन रिझव्‍‌र्ह बँकेच्या या नियमाचा अध्यादेश दाखवला. मात्र, हा नियम बदलला असल्याचे त्याला सांगण्यात आले. ‘रिझव्‍‌र्ह बँकेचे संकेतस्थळ पाहा’, असेही त्याने बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. पण, आठ दिवसात चौकशी करून सांगू, असे उत्तर देत त्याला परत पाठविण्यात आले.आठ दिवसानंतर तो पुन्हा बँकेत गेला असता अधिकाऱ्यांच्या वाईट वागणुकीचा त्याला अनुभव आला. त्यामुळे श्रीकांतने नुकसान भरपाई मिळविण्यासाठी रीतसर लेखी तक्रार नोंदवली. त्यानंतर मात्र त्याच्या लढय़ाला यश आले. तब्बल पाच महिन्यांच्या लढय़ानंतर बँकेकडून श्रीकांतच्या खात्यामध्ये बँकेला नऊ हजार सहाशे रुपयांची नुकसान भरपाई जमा करावी लागली. ग्राहक सजग असेल, तर नियमांची अंमलबजावणी होऊ शकते, असा विश्वास श्रीकांतने व्यक्त केला.
नियमांचे

फलक नाहीत
खात्यातून पैसे वजा झाल्यानंतरही एटीएममधून ते मिळाले नसल्याच्या प्रकरणात नुकसान भरपाईबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने २०११ मध्ये परिपत्रक काढले आहे. त्यानुसार या नियमांचे फलक प्रत्येक बँकेत व एटीएममध्ये लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ते कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांनाच नव्हे, तर बँकेच्या काही अधिकाऱ्यांनाही हा नियम माहीत नाही. त्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेच्या आदेशांचे तातडीने पालन करून सर्व ठिकाणी हे फलक लावावेत, अशी मागणी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.