स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायांचं पूजन केलं पाहिजे असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदू मॅरेज कोड’चा आग्रह धरला नसता तर हिंदू स्त्रियांचे काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांनी रोज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायांचं पूजन केलं पाहिजे असं विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.

तसंच धर्मांतर करताना इस्लाम न स्वीकारल्याबद्दल हिंदूंनी कायम डॉ. आंबेडकरांच्या ऋणात राहिले पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर वाङ्‍‍मय वक्तृत्व स्पर्धा समितीच्या वतीने विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. “एखाद्या व्यक्तीला समाजपुरुष मानणे हा आपला सामाजिक दोष आहे. एखाद्याला देवत्व देऊन आपण धन्य होतो. मात्र, तीही माणसेच आहेत. ती चुकू शकतात. त्यांनी काय चांगले केले त्याचे स्मरण ठेवले पाहिजे,” असं यावेळी विक्रम गोखले यांनी सांगितलं.

सावरकर-आंबेडकर एकत्र आले असते तर आजचा भारत वेगळा दिसला असता
सावरकरांचा विज्ञानवाद लोकांना पटत नाही. गाय हा पशू आहे, असं सावरकरांनी सांगितल्याने स्वत:ला हिंदू म्हणवणारा माणूस सावरकर यांच्यापासून दूर जातो ही दुर्दैवाची गोष्ट आहे. स्वत:ला स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी, सावरकरभक्त म्हणणे सोपे आहे. पण असे म्हणणाऱ्यांनी सावरकरांच्या विचारांवर प्रेम केले पाहिजे, हा माझा आग्रह आहे. देशाला सावकरांचे विचारच वाचवू शकतात. हिंदू आणि हिंदुत्त्वाची व्याख्या सावकरांकडून मिळते. सावरकरांच्या विचारांशिवाय खरा हिंदुत्ववाद समजणार नाही असं विक्रम गोखले यांनी सांगितलं आहे.

सावरकर आणि आंबेडकर एकत्र आले असते तर आजचा भारत वेगळा दिसला असता. सावरकरांनी कधीही दुसऱ्या धर्माचा द्वेष केला नाही. त्यामुळे संपूर्ण खरे सावरकर समजायला अनेक जन्म घ्यावे लागतील, असंही विक्रम गोखले म्हणाले.

आणखी वाचा – खरे सावरकर समजायला अनेक जन्म घ्यावे लागतील – विक्रम गोखले

लोकशाहीच्या नावाखाली सावरकरांवर टीका करणे चुकीचं
विक्रम गोखले यांनी यावेळी सावकरांवर टीका करणाऱ्यांना सुनावलं. “प्रत्येकाकडून काही ना काही चुका होत असतात. सावरकरांकडूनही काही चुका झाल्या असतील तर त्यांच्या स्विकार केला पाहिजे. पण कुणीही उठतो आणि लोकशाहीच्या नावाखाली सावरकरांवर टीका करतो हे फार चुकीचं आहे,” असं मत विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदूंनी एकत्र आले पाहिजे
विक्रम गोखले यांनी यावेळी बोलताना हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन केलं. “हिंदू समाज कधीही एकत्र येत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे तब्बल १४०० वर्षे आपण गुलामगिरीत जगलो. त्यामुळे हिंदू एकत्र आले तर हा देश पुन्हा ताठ कण्याने उभा राहील. हिंदुंनो, देशावर खरे प्रेम असेल तर किंवा पुढच्या पिढीवर उपकार म्हणून तरी सर्व भेद विसरून एकत्र या,” असं विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.