एकेरीवर आलो ही चूकच!

नरेंद्र मोदी यांना माफीनाम्याचे पत्र; पाकिस्तान दौऱ्याबाबतच्या आरोपांबाबत मात्र मौन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख ही चूकच होती, असा साक्षात्कार मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना संमेलन तीन दिवसांवर आले असताना झाला असला तरी मोदी यांच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत केलेले आरोप मात्र त्यांनी मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे या दौऱ्याबाबत मोदी यांच्यावर त्यांनी केलेली टीका कायम आहे का, हा प्रश्न अनुत्तरितच राहीला आहे.

‘‘माझे सत्य हे अध्यक्षपदापेक्षा मोठे असून त्याच्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही. त्यामुळे पंतप्रधानांच्या एकेरी उल्लेखाबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’’, असे मंगळवारी दुपारी पत्रकारांना ठणकावून सांगणारे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संमेलन तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना अवघ्या तीन तासांत भूमिका बदलली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करताना, ‘‘खेडूत असल्याने माझ्याकडून त्यांचा एकेरी उल्लेख झाला असून ते शब्द मी मागे घेत आहे. त्याबद्दल मी अस्वस्थ, दु:खी आणि दिलगीर आहे’’, अशा शब्दांत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र पाठवून ‘मन की बात’ सांगितली असल्याचे सबनीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. प्रत्यक्षात हे पत्र ५ जानेवारी या दिनांकाचे असून त्याची माहिती मात्र त्यांनी मंगळवारी इतक्या उशीराने जाहीर केली. पिंपरी येथील एका कार्यक्रमात सबनीस यांनी नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला होता. मोदी पाकिस्तानात गेले ही चूकच झाली. दहशतवाद्यांची एखादी गोळी लागली असती तर मंगेश पाडगावकर यांच्याआधी त्यांनाच श्रद्धांजली वाहावी लागली असती, असे तारेही सबनीस यांनी तोडले होते. या विषयावरून राज्यात वादंग निर्माण झाला होता. माफी मागत नाहीत तोपर्यंत सबनीस यांना संमेलनाच्या व्यासपीठावर पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका घेत खासदार अमर साबळे यांनी आंदोलन केले. त्या पाश्र्वभूमीवर संमेलनाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना सबनीस यांनी मंगळवारी सायंकाळी अचानक बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधानांना हिंदूीत लिहिलेले पत्र वाचून दाखविले. माझ्या मनात कुणाविषयीही किल्मिष नाही, असे सांगत सबनीस यांनी या वादावर पडदा पाडण्याची विनंती केली. ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ अशी भावना व्यक्त करताना, मराठी साहित्य आणि संस्कृतीचे संचित असलेले संमेलन सर्वाच्या सहभागातून यशस्वी करूया, असे आवाहन त्यांनी केले. आपण कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे मात्र त्यांनी स्पष्ट केले.

आतला आवाज बदलला!

दुपारी पत्रकारांशी बोलताना श्रीपाल सबनीस यांनी ‘त्या एकेरी उल्लेखासाठी लोकशाही आणि घटना पणाला लावणार का? मी एकटा पडलो असलो, तरीही माझे सत्य मात्र एकटे नाही. मी मराठी संस्कृतीचे प्रतीक आहे.’ असे सांगितले. ते असेही म्हणाले, ‘मराठी संस्कृतीला गाढवावर बसवता का? मोदी यांचा गौरव केला, म्हणून माफी मागायची का? मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भोक्ता आहे. आपले खरेच काही चुकलेले नाही, अशी ग्वाही मला आतला आवाज देत आहे.

माझी भूमिका संवादाची आहे. कुठल्याही कारणाने तो तुटू नये या भावनेतून मी एकेरी उल्लेखाचे शब्द बाजूला काढून फेकून दिले आहेत. माझ्या अनेक मित्रांनीही हे एकेरी शब्द योग्य वाटत नाहीत याची जाणीव करून दिली. माझ्याही मनाला ते पटल्यामुळे मी ते मागे घेत आहे. ज्यांची मने दुखावली असतील त्यांची आणि मोदीसाहेबांची दिलगिरी व्यक्त करतो. या भूमिकेचे स्वागत करून सर्वानी संमेलनात सहभागी व्हावे, अशी विनंती आहे.

श्रीपाल सबनीस