उच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी पुणे पोलिसांकडून कारवाई

पुणे : प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या आदेशाचे पालन न करता न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सात दिवसांच्या साध्या कैदेची तसेच दोन हजार रुपयांची शिक्षा सुनावण्यात आलेले सिंहगड इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष मारुती नवले यांची बुधवारी सायंकाळी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

नवले यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने बुधवारी  सायंकाळी नवले यांची येरवडा कारागृहात रवानगी केली. सिंहगड इन्स्टिटय़ूटच्या  प्राध्यापकांचे वेतन अनेक महिने थकवल्याप्रकरणी आंदोलने, निवेदने देण्यात आली होती. प्राध्यापकांनी केलेल्या आंदोलनानंतरही सिंहगड इन्स्टिटय़ूटने दखल घेतली नव्हती. अखेर प्राध्यापकांनी न्यायालयात धाव घेतली. प्राध्यापकांचे १८ कोटी रुपयांचे थकलेले वेतन तीन टप्प्यांत देण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते.

समाजकल्याण विभागाकडून येणे असलेले नऊ कोटी रुपये पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात जमा झाले होते. नवले यांची खाती प्राप्तिकर खात्याने गोठवली होती. नऊ  कोटी रुपये काढण्यासाठी न्यायालयाने तोंडी आदेश दिले आहेत, अशा आशयाचे पत्र नवले यांनी बँक आणि प्राप्तिकर खात्याला दिले. त्यानुसार प्राप्तिकर खात्याने पैसे काढण्यास परवानगी दिली.

हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने नवले आणि प्राप्तिकर खात्यातील अधिकारी सदाशिव मोकाशी यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान प्रकरणी कारवाई केली होती. नवले यांच्या विरोधात दाखल झालेल्या अवमान याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने नवले यांच्यासह मोकाशी यांना सात दिवसांची साधी कैद आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती.