देशात करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचं वातावरण आहे. महाराष्ट्रात तर रुग्णवाढीचा वेग पाहता चिंतेत भर पडली आहे. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी रुग्णलयात येत असल्याने आरोग्य यंत्रणेवरही ताण वाढू लागला आहे. आता तर रुग्णांना उपचारासाठी वेटिंगवर थांबावं लागत आहे. पुण्यात अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर बेड्स मिळत नसल्याची ओरड होत आहे. यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारला पत्र लिहून पुण्यातील आरोग्य व्यवस्थेची व्यथा मांडली आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्राद्वारे व्हेंटिलेटर बेड्स पुरवण्याची मागणी केली आहे. ज्या राज्यात करोना रुग्णसंख्या आटोक्यात आहे. त्या राज्यातून व्हेंटिलेटर बेड्स पुण्यात देण्यात यावे अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे. उपचाराभावी रुग्णांचा मृत्यू होऊ नये यासाठी महानगरपालिका सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.

बुधवारी पुण्यात ५,६५१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४६,०७१ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर करोनामुळे ४१ जणांना जीव गमवावा लागला आहे. करोना फैलाव सुरु झाल्यापासून आतापर्यंत एकूण ३ लाख ५ हजार ३७२ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर २ लाख ५३ हजार ७३४ जणांनी करोनावर मात केली आहे.

देशात करोनाचा कहर, २४ तासांत सव्वा लाखांहून अधिक रुग्णांची नोंद; महाराष्ट्रात ‘महा’संकट

एकीकडे पुण्यात व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता असताना राज्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. लशीचा पुरवठा करा अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

राज्यात करोना रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी स्थिती आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. घराबाहेर पडताना मास्क घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग नियमावली पाळली पाहीजे. तसेच गर्दी होण्याऱ्या ठिकाणी जाणं टाळलं पाहीजे.