देशातील लोकसंख्येचे शक्ती आणि संपत्तीमध्ये रुपांतर करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच पाया असल्याचे मत, केंद्रीय कृषिमंत्री आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले. मगरपट्टा परिसरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या ६८ हजार लोकांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची निर्यात होत असून हे ज्ञानाच्या माध्यमातूनच घडले असल्याचेही त्यांनी सांगितले.
रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन आणि पार्वतीबाई दगडू तुपे मुलींचे वसतिगृह असे नामकरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. रावसाहेब शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महापौर वैशाली बनकर, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, संस्थेचे उपाध्यक्ष रामभाऊ तुपे, पश्चिम विभाग सल्लागार मंडळाचे अध्यक्ष राम कांडगे, व्यवस्थापन समिती सदस्य विजय कोलते, सहसचिव डॉ. नानासाहेब गायकवाड, नियामक मंडळ सदस्य चेतन तुपे, दिलीप तुपे आणि माजी महापौर राजलक्ष्मी भोसले या प्रसंगी व्यासपीठावर होते. या वसतिगृहासाठी ५१ लाख रुपयांची देणगी देणाऱ्या अशोक तुपे आणि विजय तुपे यांचा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षणाचे महत्त्व ध्यानात आल्यामुळे लोकमान्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पंजाबराव देशमुख यांनी शिवाजी इन्स्टिटय़ूट अशा शैक्षणिक संस्था सुरू केल्या. या माध्यमातून संस्थांचे जाळे उभे राहिले, असे सांगून शरद पवार म्हणाले,‘‘वैद्यकीय आणि तांत्रिक शिक्षणाचे क्षेत्र आता खुले झाले असले तरी शिक्षणाची गुणवत्ता चिंता करण्याजोगी आहे.’’
पूर्वीचे हडपसर आता बदलले. हा काँग्रेस आणि समाजवाद्यांचा गड होता. निवडणुका आल्या की रामभाऊ तुपे यांना मानणाऱ्यांच्या लाल टोप्या आणि अण्णासाहेब मगर यांना मानणाऱ्यांच्या पांढऱ्या टोप्या दिसायच्या. भाजी मंडईमध्ये होणाऱ्या सभांवर निवडणूक फिरायची, या आठवणींना उजाळा देत पवार म्हणाले, रयत शिक्षण संस्था या परिसरात आली आणि येथील नागरिकांनी संस्थेच्या पाठीशी शक्ती उभी केली.
भविष्यामध्ये संस्था तांत्रिक शिक्षणावर भर देणार असल्याचे रावसाहेब शिंदे यांनी सांगितले.
काही सक्तीचे निर्णय घ्यावे लागतील
हडपसरचा झपाटय़ाने विकास झाला आहे. रस्त्यांवर वाढती वाहनांची रांग, गगनाला भिडणाऱ्या इमारती आणि उदयाला आलेला नवा वर्ग ही वैशिष्टय़े असली तरी पायाभूत सुविधांची पूर्तता करावी लागेल, असे सांगून शरद पवार म्हणाले, सरकारच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत नागरी समस्या सोडविण्याबाबत काही सक्तीचे निर्णय घ्यावे लागतील. अन्यथा  हा विकास उद्ध्वस्त होईल.