पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कल्पक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते सध्या पुण्यात अनेक कल्पना लढवत आहे. शहराच्या मध्य भागात म्हणजे शनिवार, नारायण, सदाशिव या पेठांच्या प्रभागांमध्ये इच्छुक असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनीही थेट रेल्वे इंजिन रस्त्यावर पळवण्याची कल्पना लढवली आहे. त्यासाठी रेल्वेच्या इंजिनांची आकर्षक प्रतिकृतीही त्यांनी तयार करून घेतली असून ही इंजिन सध्या प्रभागात फिरवली जात आहेत. नव्याने ती आली तेव्हा चौकाचौकात इंजिन पाहण्यासाठी गर्दी होत होती. नंतर मात्र त्याचे नावीन्य कमी झाले आहे आणि ती आता नेहमीच्या वाहनांसारखी वाटायला लागली आहेत. या इंजिनांवर संबंधित उमेदवारांच्या कार्याची माहिती देणारी ध्वनिफीत अखंड आणि उच्च पातळीवरील आवाजात वाजवली जात असते. त्यामुळे इंजिन लांब कुठे असले तरी ते लगेचच आल्याची वर्दी मिळते. आधीच इंजिनातले नावीन्य संपले आहे आणि या उमेदवारांचा असा प्रचार त्यामुळे मध्य पुण्यातील नागरिक आता इंजिन आले पळा पळा.. अशा भूमिकेत आहेत.