गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या मनसेच्या पिंपरी शहराध्यक्षपदासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत इच्छुकांशी संवाद साधला. नगरसेवक राहुल जाधव यांच्यासह सचिन चिखले व शशी राजेगावकर या इच्छुकांनी, आमच्यापैकी कोणालाही संधी द्या, अशी विनंती त्यांना केली, तेव्हा यासंदर्भात लवकरच नियुक्तीची प्रक्रिया पार पाडू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे यांच्या नेतृत्वाखालील मनसेच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हा ठाकरे यांनी विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. बऱ्याच दिवसांपासून रिक्त असलेल्या शहरप्रमुखपदावर योग्य त्या व्यक्तीची लवकरच नियुक्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मनोज साळुंके हे मनसेचे शहराध्यक्ष होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत भोसरी विधानसभेत चिखले यांना मनसेने उमेदवारी दिल्यानंतर ते प्रचंड नाराज झाले होते. साळुंके यांनी अपक्ष उमेदवार महेश लांडगे यांचा उघड प्रचार केला होता, त्यानंतर, पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या शहराध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवार मिळत नसल्याने बाहेरून कोणी येईल का, याची चाचपणीही करण्यात आली. अखेर, उपलब्ध कार्यकर्त्यांपैकी एकाची निवड व्हावी, यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. जाधव, चिखले आणि राजेगावकरांनी मिळून आमच्यापैकी कोणालाही संधी द्या, पक्षाचे एकत्रितपणे काम करू, अशी खात्री राज ठाकरे यांना दिली.