स्मार्ट सिटी योजनेला पाठिंबा देण्यावरून मनसेने अवघ्या काही दिवसांतच घुमजाव केले असून, पुणे स्मार्ट सिटीच्या केंद्राकडे पाठविण्याच्या प्रस्तावाला सोमवारी मनसेने पाठिंबा दर्शविला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दूरध्वनीवरून चर्चा झाल्यावर या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाने घेतला.
स्मार्ट सिटी योजनेतील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली. त्यानंतर या संदर्भात सर्व पक्षांच्या नेत्यांशी बोलून आपण योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते. त्यांच्या आश्वासनानंतर मनसेचा स्मार्ट सिटी योजनेला असलेला विरोध मावळला. गेल्याच आठवड्यात मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी स्मार्ट सिटी योजना फसवी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्याच दिवशी पुण्यातील स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी बोलावण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा ४ जानेवारीपर्यंत तहकूब करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेमध्ये मंजूर करण्यात आला होता. पुण्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मांडलेल्या या प्रस्तावाला मनसेनेही पाठिंबा दिला होता. स्मार्ट सिटीचे प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्राकडे पाठविण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर आहे. या पार्श्वभूमीवर या तहकुबीमुळे अनेकांनी सत्ताधारी पक्षासह मनसेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
स्मार्ट सिटी प्रस्तावाला मंजुरी घेण्यासाठी सोमवारी पुणे महापालिकेची पुन्हा एकदा सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. त्यामध्ये हा प्रस्ताव काही सुधारणांसह मंजूर होण्याची शक्यता आहे.