तापमापक, निर्जंतुकीकरणासाठी निविदा प्रक्रिया

पुणे : विद्यापीठांच्या अंतिम वर्ष परीक्षांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना आणि त्या होणार की नाहीत, याबाबत संभ्रम असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी)मात्र सप्टेंबरमधील राज्य सेवा परीक्षेची तयारी सुरू केली आहे.

परीक्षा केंद्रांचे निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर खरेदी, तापमापकांच्या खरेदीसाठी लोकसेवा आयोगाने निविदा प्रक्रिया राबवली आहे. परीक्षा केंद्रांवर संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय के ले जाणार आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्राची स्वच्छता आणि र्निजतुकीकरण करण्यात येणार असून उमेदवार आणि परीक्षा केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मुखपट्टी, हातमोजे दिले जाणार आहेत. थर्मल स्कॅनरद्वारे प्रत्येकाचे तापमानही मोजण्यात येणार आहे. एखाद्या उमेदवारामध्ये करोनाची लक्षणे आढळल्यास त्याची स्वतंत्रपणे व्यवस्था करण्याचा निर्णयही आयोगाने घेतला आहे.

परीक्षेला बनावट उमेदवार बसवण्यासारखे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक उमेदवाराची मेटल डिटेक्टरद्वारे पडताळणीही करण्यात येणार आहे. या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी आयोगाकडून सेवा पुरवठादार निवडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

आयोगाने सुधारित वेळापत्रकाद्वारे राज्यसेवा पूर्वपरीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा १ नोव्हेंबरला होणार असल्याचे जाहीर केले.

परीक्षा केव्हा?

’राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबरला

’दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ११ ऑक्टोबरला

’अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा १ नोव्हेंबरला

  • करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाय-योजनाचे नियोजन.
  • परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मुखपट्टी, हातमोजे देणार, तापमानही मोजणार.
  • केंद्रांची स्वच्छता, सॅनिटायझेशन, थर्मल स्कॅनर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया.

उमेदवारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती दक्षता घेऊन परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. देशपातळीवर परीक्षेच्या आयोजनासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयत्न होत आहे.

      – सुनील अवताडे, सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग