मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर आज मंगळवार दुपारी एक ते दीडच्या सुमारास दोन्हीबाजूची वाहतूक अर्ध्या तासासाठी बंद असणार आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर परंदवाडी येथे तुटलेल्या ओव्हरहेड हायटेन्शनची वायर बसवण्याचे काम महावितरणकडून करण्यात येणार असल्याने अर्ध्या तासासाठी वाहतूक बंद करण्यात येणार आहे अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथक पुणे प्रादेशिक विभाग पुणे यांच्याकडून देण्यात आली.

पर्यायी मार्ग म्हणून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी किवळे ब्रिज येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे. तर पुण्याच्या दिशेने ऊर्से टोल नाका येथून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन वाहतूक वळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अस आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईकडे जाणारी हलकी चारचाकी व इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील किवळे ब्रिज येथून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन मुंबईकडे वळविण्यात येणार आहे. तर पुण्याकडे येणारी वाहतूक अवजड आणि हलकी तसेच प्रवासी वाहने ही द्रुतगती उर्से टोल नाका (तळेगाव) येथून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात येणार आहेत. सर्वांनी पर्यायी मार्ग वापरून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.