पुणे शहरात १ मार्चपासून आधार कार्ड नोंदणीसाठी प्रत्येक प्रभागात दोन यंत्र उपलब्ध करून देण्याची घोषणा करूनही महापालिकेकडून त्याबाबत कोणतीही कृती झालेली नाही. त्यामुळे आधार कार्डसंबंधीचा योग्य तो खुलासा महापालिकेने जाहीररीत्या पुणेकरांसाठी करावा, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
शासनाकडून आधार कार्ड नोंदणीसाठी सातत्याने नागरिकांना आवाहन केले जात असले, तरी महापालिकेने पुणे शहरात नोंदणीसाठी केलेली व्यवस्था अतिशय अपुरी आहे. प्रत्येक प्रभागात दोन यंत्र उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊनही त्याबाबत पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला लोकप्रतिनिधी या नात्याने तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार नगरसेवक हेमंत रासने यांनी एका पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे.
स्थायी समितीच्या गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत आधार कार्ड नोंदणीसाठी पुरेशी यंत्र उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आजअखेर त्याची पूर्तता झालेली नाही. अनेक ठिकाणी आधार कार्डसाठी नागरिकांना सक्ती केली जात असून त्याबाबत शासनाचे काही आदेश आलेले आहेत का, याची माहिती नागरिकांना द्यावी, अशी मागणी रासने यांनी या पत्रातून केली आहे. आधार कार्डची नोंदणी ऐंशी टक्के पूर्ण झाल्यानंतरच सक्ती केली जाईल, असे निवेदन विधान परिषदेत करण्यात आले आहे, याकडेही या पत्रातून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
आधार कार्ड नोंदणीची यंत्र तातडीने उपलब्ध करून द्यावीत तसेच नागरिकांना या कार्डसाठीची सक्ती करण्यात आलेली नसल्यामुळे तसे निवेदन नागरिकांसाठी प्रसिद्ध करावे व योग्य तो खुलासा करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.