विभक्त होण्याची कायदेशीर प्रक्रिया पार न पाडलेले २४ विवाह रद्दबातल

पहिल्या पत्नीपासून विभक्त होण्याची कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता परस्पर दुसरा विवाह करणाऱ्यांना कौटुंबिक न्यायालयाने चपराक लगावली आहे. गेल्या तीन वर्षांत कौटुंबिक न्यायालयाने अशा प्रकारचे २४ विवाह रद्दबातल केले आहेत.

हिंदू विवाह कायद्यातील कलम ५ मध्ये काही अटी घालून देण्यात आल्या आहेत. विवाह करताना कोणते विधी पार पाडले पाहिजेत, याबाबतची तरतूद या कायद्यात आहे. पहिला विवाह झाल्यानंतर एखाद्याने कौटुंबिक न्यायालयातून विभक्त होण्याची कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता परस्पर दुसरा विवाह केला तर तो कायद्याने बेकायदा ठरविण्यात आला आहे. अशा प्रकारच्या विवाहाला कोणतेही कायदेशीर अधिष्ठान देखील देण्यात आलेले नाही. विवाह झाल्यानंतर पती अणि पत्नीत मतभेद निर्माण होतात. नातेसंबंधात कटुता आल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला जातो. विभक्त म्हणजेच घटस्फोटाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, काहीजण विभक्त होण्याची प्रक्रिया पार पडण्यापूर्वी परस्पर दुसरा विवाह करतात.

परस्पर दुसरा विवाह केल्यानंतर त्याची माहिती पती किंवा पत्नीला मिळाल्यानंतर याबाबत कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केल्यास अशा प्रकारचा विवाह बेकायदा ठरविण्याचे अधिकार न्यायालयाला आहेत. अशा प्रकारचा विवाह रद्दबातल करण्याची मागणी हिंदू विवाह कायद्यातील कलम १२ नुसार करता येते. याबाबत कौटुंबिक न्यायालयातील वकील अ‍ॅड. प्रगती पाटील म्हणाल्या, हिंदू विवाह कायद्यातील कलम पाचमधील तरतुदींनुसार पहिला विवाह करणाऱ्याचा आधी विवाह झाला नसावा. दोघेही शारीरिकदृष्टय़ा सुदृढ असावेत. त्यांच्यात काही शारीरिक उणिवा नसाव्यात. दोघेही सज्ञान असावेत. त्यांचे वय विवाहयोग्य असावे. वधू-वरात निकटचे नातेसंबंध नसावेत.

हिंदू विवाह कायद्यातील तरतुदी पाळल्या गेल्या नसतील तर न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार तक्रारदाराला आहे. न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद करण्यात येतो. त्यानंतर याबाबतचा निर्णय न्यायालयाकडून देण्यात येतो, असे अ‍ॅड. पाटील यांनी नमूद केले.