|| चिन्मय पाटणकर

राष्ट्रीय मुक्त शिक्षण मंडळाच्या पद्धतीला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

कोणाही विद्यार्थ्यांसाठी परीक्षा म्हणजे दडपणच.. अनेकदा अभ्यास झाला नाही म्हणून विद्यार्थी परीक्षा द्यायला तयारही नसतात.. कारण पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांला हवी तेव्हा परीक्षा देण्याची संधी उपलब्धच नसते. मात्र, राष्ट्रीय मुक्त शिक्षण मंडळ (एनआयओएस) विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षा देण्याची संधी देते. म्हणूनच राष्ट्रीय मुक्त शिक्षण मंडळाची ऑन डिमांड एक्झामिनेशन सिस्टिम, अर्थात ‘हवी तेव्हा परीक्षा’ ही पद्धत देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

एनआयओएसतर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे २००५ आणि २००७ पासून ‘मागाल तेव्हा परीक्षा’ ही पद्धत सुरू करण्यात आली. एनआयओएसच्या पुणे विभागाअंतर्गत महाराष्ट्र आणि गोवा ही दोन राज्ये येतात. त्यात मागाल तेव्हा परीक्षा या पद्धतीसाठी महाराष्ट्रात पुणे, नागपूर आणि मुंबई येथे मिळून चार केंद्रे आणि गोव्यात एक केंद्र आहे. या पद्धतीमध्ये एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर वगळता वर्षभरात कधीही परीक्षा देता येते. परीक्षा दिल्यानंतर केवळ ४५ दिवसांत त्याचा निकाल जाहीर होतो. परीक्षेसाठी एनआयओएसच्या प्रश्नसंचातून प्रत्येकवेळी नवीन प्रश्नपत्रिका तयार होते. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि लेखी या दोन्ही परीक्षा देता येतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक विषयात कितीही वेळा परीक्षा देता येते.

‘देशभरातील पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण आणि परीक्षा या शिक्षककेंद्री आहेत. तर ‘एनआयओएस’च्या आधुनिक शिक्षण पद्धतीनुसार ‘हवी तेव्हा परीक्षा’ ही विद्यार्थिकेंद्री पद्धत आहे. कारण विद्यार्थ्यांला त्याचा अभ्यास झाल्यावर परीक्षा देण्याची मुभा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी मोकळीक राहते. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांला ऑनलाइन नोंदणी करून आपल्या सोयीनुसार परीक्षेची तारीख, परीक्षा केंद्र निवडता येते. विद्यार्थ्यांने परीक्षा केंद्र निवडल्यानंतर संबंधित केंद्राला कळवण्यात येते. त्यानंतर परीक्षा घेतली जाते. कमीत कमी एक विद्यार्थी ते एनआयओएसच्या अभ्यास केंद्रात पन्नास विद्यार्थ्यांना आणि अन्य केंद्रावर वीस विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते,’ असे एनआयओएसच्या पुणे विभाग संचालिका डॉ. सौम्या राजन यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

आकडेवारी (विषयनिहाय)

२०१५-१६                                         २०१७-१८

दहावी – १४ हजार २१                        दहावी – ३७ हजार ५३

बारावी – ६१ हजार ३५७                     बारावी – १ लाख ८ हजार ६५६

अन्य विद्यार्थ्यांनाही संधी..

मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या किंवा परीक्षा देऊ न शकलेल्या अन्य विद्यार्थ्यांनाही एनआयओएसच्या ‘हवी तेव्हा परीक्षा’ या पद्धतीचा वापर करता येतो. त्यासाठी ‘ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्स’ घेता येतात. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एनआयओएसचे प्रमाणपत्र मिळते, अशी माहिती डॉ. राजन यांनी दिली.