पिंपरीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय होत नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांवर टीका करत राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलेले राजीनामे कोणताही निर्णय होण्याआधीच मागे घेतले. एका महिन्यात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे राजीनामे मागे घेतल्याचा दावा आमदारांनी केला आहे.
विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, बापू पठारे या राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी बांधकामांच्या बाबतीत मुख्यमंत्री निर्णय घेत नाही, या कारणास्तव विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राजीनामा दिला, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, हे राजीनामे मान्य होणार नाहीत, हे उघड गुपित होते. हिवाळी अधिवेशनात याबाबतचे विधेयक मांडण्यात येईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आमदार सांगत होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना खिंडीत गाठण्यासाठी राजीनामा देऊन मुख्यमंत्र्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून झाला. तथापि, अधिवेशनात विधेयक न मांडल्याने राजीनाम्याची ‘नौटंकी’ करून काही उपयोग झाला नाही.
दरम्यान, एका महिन्यात सकारात्मक निर्णय होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा दावा आमदारांनी केला आहे. रविवारी महापालिकेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पिंपरीत येत आहेत. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर येत असल्याने याबाबतचे पडसाद उमटणार आहे. त्यामुळे शहरातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.

..तसे आदेश आयुक्तांना द्या!
एक महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले आहे. तसे प्रतिज्ञापत्र सरकारने न्यायालयात द्यावे, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी केली आहे. निर्णय होणारच असल्याने पालिका आयुक्तांनी तोपर्यंत पाडापाडी करू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना द्यावेत, असे बनसोडे यांनी म्हटले आहे.