डॉ. नीलम गोऱ्हे यांची खंत; असंस्कृत पद्धतीने निर्णय घेत असल्याचा आरोप

वेगाने वाढत असलेल्या पुणे शहराच्या विकासाबाबत घेतल्या जात असलेल्या निर्णयामध्ये आमदारांना डावलले जात असल्याची खंत शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी केली. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि स्मार्ट सिटीसंदर्भात निर्णय घेताना विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांना डावलून पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात असंस्कृत पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजात राज्यातील महिला अत्याचार २०१८ अधिवेशन कायदा-सुव्यवस्था, आर्थिक घडामोडी, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, जातपंचायतीचा समाजात वाढत असलेला हस्तक्षेप अशा विविध मुद्दय़ांवर आवाज उठविण्यात आला, अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पीएमआरडीए आणि स्मार्ट सिटीबाबत विविध निर्णय घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे वेळोवेळी बैठका घेतल्या जातात. अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील या संदर्भात बैठका झाल्या. परंतु, विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना साधा निरोप देण्याचे सौजन्य देखील दाखविले गेले नाही, असे सांगून गोऱ्हे म्हणाल्या, वेगाने वाढणाऱ्या शहराच्या विकासासाठी पीएमआरडीए स्थापन करावे यासाठी मी २००६ पासून पाठपुरावा केला होता. वाहतूक, पाणी आणि कचरा या समस्यांसह गावठाणांचे आरक्षण असे प्रश्न सोडविण्यासाठी निर्णय घेताना आमदारांची मते जाणून घेणे आवश्यक असते. खुलेपणाने माहिती दिली जात नाही. लोकप्रतिनिधींशी संवाद करायचे सोडून हा पडदा कशासाठी ठेवला जात आहे? एकीकडे पारदर्शी कारभार असल्याचे सांगणारे सरकार मुंबई महापालिकेत मात्र, पहारेकऱ्याची भूमिका बजावत आहे.

रमाबाई आंबेडकर पुतळ्याचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यास चालना

भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्या देशातील पहिल्या पुतळ्याचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोिवद यांच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी स्मारक समितीच्या वतीने विठ्ठल गायकवाड, अमोल देवळेकर आणि नगरसेविका पल्लवी जावळे यांनी माझ्याकडे केली होती. या संदर्भात शिवसेनेची प्रवक्ता या नात्याने मी आणि भाजपचे प्रवक्ते भाई गिरकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली. राष्ट्रपती कोविंद यांच्या वेळेसाठी पाठपुरावा करून त्यांना उद्घाटनासाठी घेऊन येऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.