News Flash

दहावीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात चित्रपट, नाटय़, प्रसारमाध्यमांचाही समावेश

आराखडय़ावर अभिप्राय देण्यासाठी उद्यापर्यंत मुदत

दहावीच्या इतिहास विषयांत आता राजकीय, सामाजिक, भौगोलिक घटकांबरोबरच सांस्कृतिक घटकांचाही समावेश करण्यात आला आहे. इतिहासाच्या पुस्तकात चित्रपट, नाटय़, प्रसारमाध्यमे यांचा इतिहास, त्यांचे ऐतिहासिक घटनांमधील स्थान यांचाही अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे.

राज्याच्या अभ्यासक्रमात एकसंधता यावी, यासाठी सातवी ते दहावी एकच अभ्यासमंडळ नेमून नवा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. सातवी ते दहावी अशा चारही वर्षांच्या सगळ्या विषयांच्या आराखडय़ात काही बदल करण्यात आले आहेत. नव्या अभ्यासक्रम आराखडय़ात इतिहास विषयांत राजकीय, सामाजिक इतिहासाबरोबरच सांस्कृतिक घटकांचाही समावेश करण्यात आला आहे. ऐतिहासिक चित्रपटांवरून होणारे वाद, सांस्कृतिक घटकांवर होणारा परिणाम या पाश्र्वभूमीवर चित्रपट, नाटय़ या माध्यमांचे इतिहासातील स्थान, या माध्यमांमधून झालेले सांस्कृतिक संक्रमण, ऐतिहासिक नाटके, नाटकांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रसारमाध्यमे आणि इतिहास या घटकाचाही समावेश करण्यात आला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने इतिहासाचे महत्त्व, कला, खेळांचा इतिहास यांचाही समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत इतिहासाच्या पुस्तकांत असलेली महायुद्धे, परदेशातील चळवळी, क्रांती यांचा अभ्यासक्रमातील प्रमाण कमी होणार आहे. नववीच्या अभ्यासक्रमात खासगीकरण, उदारीकरण, भारताची बदलत गेलेली आर्थिक धोरणे, शिक्षण, वैज्ञानिक प्रगती यांतील महत्त्वाचे टप्पे यांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील वर्षांपासून या नव्या आराखडय़ानुसार टप्प्याटप्प्याने पुस्तके लागू होणार आहेत.

आराखडय़ावर अभिप्राय देण्यासाठी उद्यापर्यंत मुदत

शिक्षण विभागाने नवा अभ्यासक्रम आराखडा बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. भाषा, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणित, विज्ञान या विषयांचा सातवी ते दहावीचा आराखडा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या आराखडय़ावर अभिप्राय देण्यासाठी शुक्रवापर्यंत

(२५ नोव्हेंबर) मुदत देण्यात आली आहे. मात्र आराखडा जाहीर झाल्याचेच कळले नसल्याचा आक्षेप शिक्षकांकडून घेण्यात येत आहे. त्या पाश्र्वभूमीवर अभिप्राय देण्यासाठीची मुदत वाढवून देण्याची मागणी शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. आराखडा http://ebalbharati.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 12:05 am

Web Title: new changes in ssc exam syllabus
Next Stories
1 ‘फॅन्सी नंबर’ची हौस कायम
2 नोटाबंदीचा छोटय़ा व्यावसायिकांना फटका
3 ‘हॉलिडे स्पेशल’ गाडीचा बोजवारा
Just Now!
X