सरत्या वर्षांला निरोप आणि नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी शहराच्या प्रमुख रस्त्यांवर एकवटलेली तरुणाई.. हॉटेलांमध्ये झालेली खवय्यांची गर्दी.. समाजमाध्यमांतून एकमेकांना पाठविण्यात येणारे संदेश अन् नव्या वर्षांचे नवे संकल्प करीत शहरात जल्लोषपूर्ण वातावरणात नव्या वर्षांचे स्वागत करण्यात आले. मात्र, त्याबरोबरीनेच उत्साही वातावरणातील व्यसनांची काजळी दूर करण्याच्या दृष्टीने विविध संस्था, संघटना आणि तरुणाईने व्यसनविरोधी जनजागृतीही केली. ‘द’ दारूचा नव्हे, ‘द’ दुधाचा’ या उपक्रमाचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते.

नव्या वर्षांच्या स्वागतासाठी रविवारी संध्याकाळनंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर तरुणाईचे जथ्थे जमा होऊ लागले होते. विशेषत: फग्र्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि लष्कर भागातील रस्त्यांवर प्रामुख्याने उत्साही वातावरण दिसून येत होते. या रस्त्यांवरील विविध हॉटेलमध्ये नववर्षांच्या स्वागत पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक सजावट आणि खाद्यपदार्थावर विशेष सवलत देऊन ग्राहकांना आकर्षित करण्यात येत होते. त्यामुळे रात्री आठनंतर बहुतांश हॉटेलमध्ये खवय्यांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. खाद्यपदार्थाच्या गाडय़ांभोवतीही तरुणाई दिसून येत होती.

रात्री नऊनंतर प्रमुख रस्त्यांवर तरुणाईची गर्दी मोठय़ा प्रमाणावर वाढली. रंगीबिरंगी विद्युत दिवे, विविधरंगी फुगे आणि उत्साही तरुणाईमुळे रस्त्यावरील वातावरण बदलून गेले होते. रात्री फग्र्युसन रस्त्यावरील गर्दी वाढल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी अंशत: बंद करण्यात आला. त्याचप्रमाणे मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून तपासणीही करण्यात आली. त्यासाठी शहराच्या विविध भागात तपासणी पथके कार्यरत करण्यात आली होती.

नववर्षांच्या स्वागताचा जल्लोष सुरू असतानाच दुसरीकडे तरुणाईच्याच सहभागाने व्यसनाच्या विरोधात जनजागृतीही करण्यात आली. त्यासाठी रविवारी सकाळपासूनच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या वतीने डेक्कन येथील नामदार गोखले चौकात ‘दारू नको, दूध प्या’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मद्यपान न करण्याचा संदेश देणाऱ्या यमराजाची वेषभूषा केलेल्या कलाकाराने या उपक्रमात लक्ष वेधून घेतले. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर पथनाटय़ही सादर केले. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, राजन चांदेकर, प्रकाश धिडे, प्रमोद शेळके, अनिरुद्ध हळंदे आदी त्या वेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पुणे शाखा आणि मॉडर्न महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी व्यसनविरोधी रॅली काढून  ‘द’ दारूचा नव्हे, ‘द’ दुधाचा’ उपक्रमाचे आयोजन केले. प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी या वेळी मार्गदर्शन केले. फग्र्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार ते वि. रा. शिंदे पुलापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत दुधाचे वाटप करून व्यसनमुक्तीबाबत जागृती करण्यात आली. समितीचे राज्य सरचिटणीस ठकसेन गोराणे, शहराध्यक्ष श्रीपाल ललवाणी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी पी. एस. सांबरे यांनी उपक्रमाचे नियोजन केले. डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशनल ट्रस्ट आणि सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या वतीनेही ‘दारू सोडा, दूध प्या’ अभियान राबविण्यात आले.