News Flash

तपासधागा : नायजेरियन चोरटय़ांचे मदतनीस जाळ्यात

नायजेरियन चोरटय़ांबरोबरच देशातील काही सुशिक्षित तरुण देखील सायबर गुन्हय़ांमध्ये सक्रिय आहेत

फसवणुकीसाठी बनावट बँक खाती

सायबर गुन्हय़ांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जगभरात सायबर गुन्हेगार सक्रिय आहेत. फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळी शक्कल लढवत असतात. काही वर्षांपूर्वी हजारो पौंडाची ब्रिटिश लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून देशभरातील अनेकांची फसवणूक करण्याचे प्रकार घडले होते. सायबर गुन्हय़ांमध्ये नायजेरियन चोरटे वाकबगार मानले जातात. नायजेरियन चोरटय़ांबरोबरच देशातील काही सुशिक्षित तरुण देखील सायबर गुन्हय़ांमध्ये सक्रिय आहेत. काही महिन्यांपूर्वी आयुर्वेदिक तेलाच्या व्यवसायात नफा मिळवण्याच्या आमिषाने चिंचवड भागातील एका व्यावसायिकाला तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. व्यावसायिकाला वेगवेगळय़ा बँकांच्या खात्यात पैसे भरण्याची सूचना चोरटय़ांकडून करण्यात आली होती. नायजेरियन चोरटय़ांना पकडण्यात आल्यानंतर बनावट बँक खाते काढून त्यांना मदत करणाऱ्या साथीदारांचा शोध सुरू करण्यात आला. सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या तपासात नायजेरियन चोरटय़ांचे मदतगार केरळमधील निघाले. बनावट बँक खाते काढून नायजेरियन चोरटय़ांना मदत करणाऱ्या आरोपींचा छडा लावून या प्रकरणात नुकतेच तिघांना पकडण्यात आले.  मूळचे नायजेरियाचे असलेले चोरटे व्यवसाय, शिक्षणासाठी देण्यात येणारा व्हिसा मिळवून वास्तव्यास येतात. आफ्रिका खंडातील नायजेरियातील अनेक युवक अमली पदार्थ तस्करी, सायबर गुन्हय़ांमध्ये सामील आहेत. अनेक जण व्हिसाची मुदत संपल्यानंतर देशात वास्तव्य करतात. मुंबई, पुणे, दिल्लीसह देशातील प्रमुख महानगरात नायजेरियन युवक-युवती शिक्षणाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत, मात्र काही जण झटपट पैसे कमावण्यासाठी सायबर गुन्हेगारीकडे वळतात. काही जण नायजेरियात राहून तेथून सायबर गुन्हे करतात. युरोप, अमेरिकेतील मोबाइल कंपन्यांचे सीमकार्ड वापरून नागरिकांशी संपर्क साधून त्यांना निरनिराळय़ा प्रकारचे आमिष दाखवले जाते. काही वर्षांपूर्वी नायजेरियन चोरटय़ांनी लॉटरी लागल्याच्या आमिषाने देशभरातील अनेकांची फसवणूक केली होती. फसवणूक करण्यासाठी चोरटय़ांकडून निरनिराळी शक्कल लढवली जाते. गेल्या वर्षभरापासून नायजेरियन चोरटय़ांनी आयुर्वेदिक तेलाच्या विक्रीत नफा मिळवून देणे, आयुर्वेदिक बी-बियाण्यांची विक्री अशा प्रकारचे आमिष दाखवून फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

सात महिन्यांपूर्वी चिंचवड भागातील एका व्यावसायिकाला एका युवतीने फेसबुकवर मैत्रीची विनंती पाठवली होती. ती युवती मूळची परदेशातील होती. प्रत्यक्षात फेसबुकवर बनावट खाते काढून नायजेरियन चोरटय़ांनी व्यावसायिकाला मैत्रीची विनंती पाठवली होती. त्यानंतर व्यावसायिक युवतीच्या संपर्कात आला. युरोपातील एका आयुर्वेदिक तेलाच्या निर्मिती करणाऱ्या कंपनीत कामाला असल्याची बतावणी बनावट फेसबुक खात्याद्वारे व्यावसायिकाकडे करण्यात आली होती. आयुर्वेदिक तेलाच्या विक्रीत भरपूर नफा मिळतो, असे आमिष दाखवून व्यावसायिकाला कुठले तरी तेल आयुर्वेदिक असल्याचे भासवून त्याचे डबे पाठवण्यात आले. त्यानंतर व्यावसायिकाला आयुर्वेदिक तेलाच्या खरेदीसाठी पैसे भरण्यास सांगण्यात आले. व्यावसायिकाकडून वेळोवेळी एक कोटी चार लाख ४७ हजार रुपये उकळण्यात आले. त्याला सांगण्यात आलेल्या बँक खात्यात वेळोवेळी पैसे भरण्यात आले, मात्र आयुर्वेदिक तेल न मिळाल्याने व्यावसायिकाने पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेऊन नायजेरियन चोरटय़ांचा माग काढण्यात आला. नवी मुंबईतील पनवेल भागात वास्तव्यास असलेले नायजेरिन चोरटे अमारा ओबेसोगू ऊर्फ रॉबर्ट सिफ (वय ३०) आणि एकने उचेनुकू (वय ३०) यांना अटक करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्याकडून वीस मोबाइल संच, दोन लॅपटॉप असा माल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर व्यावसायिकाची फसवणूक करण्यासाठी आलेल्या बँकांमधील खातेदारांचा माग काढण्यास सायबर गुन्हे शाखेकडून सुरुवात करण्यात आली. तपासात फसवणूक करण्यासाठी आलेली सात बँक खाती चेन्नईतील वेगवेगळय़ा बँकांमधील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचे पथक तातडीने चेन्नईला रवाना झाले. तेव्हा खातेदार तेथे राहत नसल्याचे उघडकीस आले. दरम्यान, नायजेरियन चोरटय़ांचे मदतनीस असलेले बँक खातेदार चेन्नई, केरळ, मुंबई, मीरा रोड भागांत भाडेतत्त्वावर खोली घेऊन वास्तव्य करत असल्याची माहिती तपासात मिळाली. २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील भेंडीबाजार येथे असलेल्या गेस्ट हाउसवर छापा टाकून आरोपी आशिष मोईद्दीन आशिक ऊर्फ राजेश बाबू प्रभाकरन (वय ४३), रेजी पीआर ऊर्फ किरण सूर्या उन्नीकृष्णन (वय ३६) आणि शाहुल अहमद उल्ला हमीद ऊर्फ रविकुमार रामकुमार (वय ३२, तिघे मूळ रा. केरळ) यांना पकडण्यात आले. आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळय़ा नावाने २४ बँकांमध्ये खाते काढल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी रविकुमार याच्याकडे वृत्तपत्र व्यवसायाशी संबंधित ओळखपत्र सापडले आहे. तिघा आरोपींकडून विविध बँकांच्या ४५ धनादेशपुस्तिका, १७ खातेपुस्तिका, ३७ डेबिट कार्ड, ९ मोबाइल संच, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. आरोपींच्या बँक खात्यात १३ लाख ४० हजार तसेच २२ लाख १० हजारांची रोकड असल्याचे उघडकीस आले आहे. बँक खात्यातील रोकड गोठवण्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिली.

आरोपी नायजेरियन चोरटय़ांना मदत करत होते. बनावट नावाने काढण्यात आलेल्या बँक खात्यांतील रक्कम चोरटय़ांना दिल्यानंतर त्यापैकी काही रक्कम ते घ्यायचे. सायबर गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त मिलिंद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पवार, उपनिरीक्षक प्रवीण स्वामी, अजित कु ऱ्हे, राजकुमार जाबा, दीपक भोसले, नीतेश शेलार, अतुल लोखंडे, शाहरूख शेख, मितेश बिच्चेवार, दीपक माने, संतोष जाधव यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 3:45 am

Web Title: nigerian theft cyber crime
Next Stories
1 नामवंतांचे बुकशेल्फ : वाचन ही ब्रह्मानंदाकडे जाण्याची पाऊलवाट 
2 ‘त्या’ खड्ड्यातील पाण्याची तपासणी करणार
3 बहुमताने सायकल शेअरिंगच्या योजनेला मंजुरी
Just Now!
X